पश्चिम महाराष्ट्राचा व्हॉईस ऑफ मिडिया कॅडर कॅम्प सांगलीत उत्साहात
* राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के यांच्या उपस्थितीत आयोजन; बुलढाण्याचे दोन सुपुत्र एकाच व्यासपीठावर
सांगली : (एशिया मंच न्यूज )
पत्रकार आणि पत्रकारांच्या कुटुंबीयांच्या सर्वांगीण उन्नतीचा ध्यास घेऊन कार्यरत असलेल्या व्हॉईस ऑफ मिडिया संघटनेचा पश्चिम महाराष्ट्र विभागीय एकदिवसीय कॅडर कॅम्प सांगली येथे उत्साहात पार पडला. या कॅडर कॅम्पचे उद्घाटन व्हॉईस ऑफ मिडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के आणि सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी IAS विशाल नरवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी सांगलीचे जिल्हा पोलीस अधीक्षकही उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे बुलढाण्याच्या मातीतून पुढे आलेले दोन सुपुत्र एकाच व्यासपीठावर आले. व्हॉईस ऑफ मिडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के हे बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र असून, त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने राष्ट्रीय स्तरावर विस्तार केला आहे. पत्रकारांच्या हक्कांसोबतच सकारात्मक व मूल्याधारित पत्रकारितेला प्रोत्साहन देणे तसेच पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबविणे, हा संघटनेच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे.
दुसरीकडे, मूळचे बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र असलेले IAS विशाल नरवाडे हे सध्या सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नरवाडे यांना व्हॉईस ऑफ मिडियाच्या पश्चिम महाराष्ट्र टीमकडून या कॅडर कॅम्पसाठी विशेष निमंत्रण देण्यात आले होते.
पत्रकारिता आणि प्रशासन या दोन वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत असलेले बुलढाण्याचे हे दोन्ही सुपुत्र सांगलीत एकाच व्यासपीठावर आल्याने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
अनिल म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली व्हॉईस ऑफ मिडियाची राष्ट्रीय स्तरावरील वाटचाल आणि IAS विशाल नरवाडे यांची प्रशासकीय क्षेत्रातील कारकीर्द यामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
