बुलढाणा : विज्ञान प्रदर्शनीत जिल्हा परिषद शाळेचा डंका* जयच्या 'स्मार्ट ब्लाइंड स्टिक'ने मारली बाजी !

बुलढाणा : विज्ञान प्रदर्शनीत जिल्हा परिषद शाळेचा डंका
* जयच्या 'स्मार्ट ब्लाइंड स्टिक'ने मारली बाजी !
​बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
         एकीकडे जिल्हा परिषद शाळा बंद पडत असल्याच्या आणि त्यांचा दर्जा टिकवण्यासाठी कसरत करावी लागत असल्याच्या चर्चा सुरू असतात; मात्र दुसरीकडे बुलढाणा तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल देऊळघाटच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आपल्या कर्तृत्वाने एक नवा आदर्श निर्माण केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात या शाळेतील विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन केले आहे.

      पार पडलेल्या ​तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये जिल्हा परिषद हायस्कूल देऊळघाटचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी जय निलेश हिवाळे याने अत्यंत उपयुक्त अशी 'स्मार्ट ब्लाइंड स्टिक' (अंध व्यक्तींसाठी काठी) हे उपकरण तयार केले. त्याच्या या नाविन्यपूर्ण प्रकल्पाने उपस्थितांचे व परीक्षण करणाऱ्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले. या प्रदर्शनात त्याने प्रथम क्रमांक पटकावला.
        ​या यशामुळे गट विकास अधिकारी वादिळे  यांच्याहस्ते जय निलेश हिवाळे याचा विशेष सन्मान करण्यात आला.

*​ मार्गदर्शक शिक्षकांचे मोठे योगदान : 
        ​राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला पूरक ठरणाऱ्या डिजिटल शिक्षणाला प्राधान्य देत शाळेतील विज्ञान शिक्षिका सौ. सुवर्णा सुनील सपकाळ आणि सौ. माधवी अमरीश देशपांडे यांनी मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी अथक प्रयत्न केले.
​"वैज्ञानिक दृष्टी ही आयुष्यभरासाठी नवी दृष्टी देते आणि विज्ञानाकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन निर्माण करते," हा कानमंत्र देत सौ. सपकाळ आणि सौ. देशपांडे हे शिक्षक विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन करत असतात. याच मार्गदर्शनामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने तालुक्यात शाळेचा झेंडा रोवला आहे.
​विज्ञान प्रदर्शनीचा यशस्वी सोहळा
​ २६ व २७ ऑक्टोबर रोजी पार पडला. ही तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी केवळ स्पर्धा म्हणून नव्हे, तर विद्यार्थ्यांना विज्ञानाची नवी क्षितिजे आणि नवी दृष्टी देणारी ठरली. देऊळघाट येथील जिल्हा परिषद शाळेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून जय हिवाळे आणि त्याच्या मार्गदर्शक शिक्षिकांचे अभिनंदन केले जात आहे.