प्रतिबंधित पानमसाला, सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्यांवर संयुक्त कारवाई ; १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त!* वनविभाग, पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

प्रतिबंधित पानमसाला, सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्यांवर संयुक्त कारवाई ; १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त!
* वनविभाग, पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
बुलढाणा  : (एशिया मंच न्यूज )
      प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध वनविभाग, पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई करीत तब्बल १९ लाख ९७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. २९ ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनातून प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची वाहतूक होत असल्याचे उघड झाले.
       वनविभागाला खामगाव-मेहकर मार्गावरील पाथर्डी चेक पोस्ट येथे तसेच जानेफळ पोलीस स्टेशनला प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन, बुलढाणा यांनी संयुक्त पथकाच्या माध्यमातून ही कारवाई केली.
या कारवाईत १२ लाख ४८ हजार रुपये किमतीचा केसरयुक्त विमल पानमसाला, २ लाख ४९ हजार ६०० रुपये किमतीची V-01 सुगंधित तंबाखू आणि ५ लाख रुपये किमतीचे महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन (क्रमांक MH-28-BB-4789) असा एकूण १९ लाख ९७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
      या प्रकरणी वैभव सुरेश डमरे (रा. चांदमारी, ता. खामगाव, जि. बुलढाणा) याच्याविरुद्ध जानेफळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ०३८८/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, २७४, २७५ व २२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ मधील संबंधित तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, संबंधित व्यक्तीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची सखोल चौकशी करून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का), १९९९ अंतर्गत कारवाईच्या दृष्टीने आवश्यक कायदेशीर बाबींची तपासणी करण्याबाबतही फिर्याद देण्यात आली आहे.
       या संयुक्त कारवाईत वनविभाग, बोथा आणि जानेफळ पोलीस स्टेशनच्या पथकांनी सहकार्य केले. अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने अन्न सुरक्षा अधिकारी अ. सं. भोपाळे यांनी सहायक आयुक्त (अन्न) बुलढाणा पी. एस. पाटील आणि सहआयुक्त (अन्न) अमरावती विभाग स. द. केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

* अवैध तंबाखू विक्रीवर प्रशासनाचा वॉच!
        प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची अवैध विक्री, साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. विविध विभागांच्या समन्वयातून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.