* आरक्षित पाण्याचे नियोजन करून तूर, कपाशी, हळद व चाऱ्यासाठी टप्प्याटप्प्याने पाणी सोडणार
* केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या शेतकरी हिताच्या भूमिकेला यश
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज)
जिल्ह्यातील अपुऱ्या पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री तथा बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील जलप्रकल्पांमध्ये भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन पिण्यासाठी आणि इतर आवश्यक बाबींसाठी पाणी आरक्षित ठेवल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या शिल्लक पाण्यातून खरीप हंगामातील तूर, कपाशी, हळद या पिकांसह चाऱ्यासाठी पाणी देण्यास जिल्हा प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यानुसार प्रकल्पातील शिल्लक पाणी टप्प्याटप्प्याने सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जिल्ह्यातील अनेक भागांत पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. काही ठिकाणी पिके पाण्याअभावी वाळण्याच्या मार्गावर आहेत, तर काही शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत तूर, कपाशी आणि हळद या उभ्या पिकांना एक वेळ पाणी मिळाल्यास काही प्रमाणात उत्पादनाची आशा निर्माण होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे पाणी सोडण्याची मागणी केली होती.
शेतकऱ्यांची व्यथा आणि खरीप पिकांचे संभाव्य नुकसान लक्षात घेऊन प्रतापराव जाधव यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये जिल्ह्यातील विविध जलप्रकल्पांमधील सद्यस्थितीतील पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात आला. भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
प्रकल्पांमधील एकूण पाणीसाठा, पिण्यासाठी आवश्यक असणारे पाणी, संभाव्य बाष्पीभवनामुळे होणारी पाण्याची घट आणि भविष्यातील पाणीटंचाईचा विचार करून दहा टक्के अतिरिक्त पाणीसाठा राखून ठेवण्याचे नियोजन करण्यात आले. या सर्व बाबींचा विचार केल्यानंतर प्रकल्पांमध्ये किती पाणी शिल्लक राहू शकते आणि त्यातून खरीप पिकांना किती प्रमाणात पाणी देता येईल, याची चाचपणी करण्याचे निर्देश प्रतापराव जाधव यांनी अधिकाऱ्यांना दिले होते.
त्यानुसार प्रशासनाने युद्धपातळीवर सर्वेक्षण करून पाणीसाठ्याचे सूक्ष्म नियोजन केले. भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज आणि आवश्यक राखीव साठा सुरक्षित ठेवून उर्वरित शिल्लक पाण्यातून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना पाणी देण्याबाबत प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला आहे.
* शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा!
जिल्हा प्रशासनाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. प्रकल्पांमधील उपलब्ध शिल्लक पाणी टप्प्याटप्प्याने तूर, कपाशी, हळद या पिकांसह चारा उत्पादनासाठी सोडण्यात येणार आहे. मात्र, या पाण्याचा वापर शेतकऱ्यांनी अत्यंत काटकसरीने करावा. उपलब्ध पाणी केवळ खरीप पिकांना जीवदान देण्यासाठी वापरावे, रब्बी हंगामातील पिकांसाठी या पाण्याचा वापर करू नये, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे.
प्रशासन आणि शेतकरी यांच्यात समन्वय साधत उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करून संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका प्रतापराव जाधव यांनी घेतली आहे. त्यांच्या पुढाकारामुळे खरीप पिकांना शिल्लक पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
