धनादेश अनादर प्रकरणी सोयाबीन व्यापाऱ्याला तीन महिने कारावास! : बुलढाणा न्यायालयाचा निकाल
* ॲड. गुणवंत नाटेकर यांचा प्रभावी युक्तीवाद
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
शेतकऱ्याने विकलेल्या सोयाबीनचे पैसे न दिल्याने आणि दिलेला धनादेश अनादरित झाल्याप्रकरणी बुलढाणा न्यायालयाने सोयाबीन व्यापाऱ्याला दोषी ठरवत तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच शेतकऱ्याला एक लाख ७५ हजार रुपये देण्याचे आदेश दिले.
साखळी बु. येथील शेतकरी श्याम देशमुख यांनी २०२० मध्ये मालवंडी येथील व्यापाऱ्याला २ लाख ७७ हजार रुपयांचे सोयाबीन विकले होते. त्यापैकी उर्वरित १ लाख १० हजार रुपयांसाठी व्यापाऱ्याने १५ डिसेंबर २०२० रोजी मराठा अर्बन पतसंस्थेचा धनादेश दिला. मात्र, बँकेत जमा केल्यानंतर तो अनादरित झाला.
याप्रकरणी शेतकरी देशमुख यांनी ॲड. गुणवंत नाटेकर यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेतली. सुनावणीदरम्यान आरोपीच्या वकिलांनी पतसंस्थेच्या धनादेशाबाबत आक्षेप घेतला. त्यावर ॲड. नाटेकर यांनी केरळ उच्च न्यायालयाचा २६ मार्च २०२६ रोजीचा क्लारा डॉमिनिक विरुद्ध टॉमी ईपन हा न्यायनिर्णय सादर करून प्रभावी युक्तिवाद केला.
दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी टेकवाणी यांच्या न्यायालयाने व्यापाऱ्याला दोषी ठरवत तीन महिने कारावास आणि एक लाख ७५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
या निकालामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे पैसे बुडविणाऱ्या व्यापाऱ्यांना कायद्याचा इशारा मिळाला असून, शेतकरी वर्गात या निर्णयाची चर्चा होत आहे. शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी ॲड. गुणवंत नाटेकर यांनी प्रभावीपणे बाजू मांडली.
