भोसा जंगलात १४५ सागवान वृक्षांची अवैध कत्तल; दोघांना अटक* वनविभागाची मोठी कारवाई; ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त, नागपूरमधील लाकूड व्यापाऱ्याचीही चौकशी

भोसा जंगलात १४५ सागवान वृक्षांची अवैध कत्तल; दोघांना अटक
* वनविभागाची मोठी कारवाई; ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त, नागपूरमधील लाकूड व्यापाऱ्याचीही चौकशी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
      जिल्ह्यातील घाटबोरी वनपरिक्षेत्रांतर्गत भोसा नियतक्षेत्रातील वनजमिनीवर सागवान वृक्षांची अवैध कत्तल झाल्याचे उघडकीस आले आहे. वनविभागाच्या तपासणीत वनक्षेत्रातील १४५ सागवान वृक्षांची तोड झाल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांची किंमत ३५ लाख २६ हजार ४४९ रुपये असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, जेसीबी, ट्रॅक्टर, टेम्पो, हायड्रा व कटर मशीनसह सुमारे ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नागपूरमधील लाकूड व्यापाऱ्याचीही चौकशी करण्यात आली आहे.
वनगुन्ह्याची नोंद; तपासाला सुरुवात
      २ ऑक्टोबर २०२६ रोजी वनअधिकारी व कर्मचारी भोसा नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक १८१ मध्ये गस्त घालत असताना सागवान वृक्षांची अवैध तोड झाल्याचे आढळले. घटनास्थळी आढळलेल्या १०३ वृक्षांच्या ठुटांवरून वनअपराधाची नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा तपास वनपरिक्षेत्र अधिकारी अंकुश येवले यांनी सुरू केला. त्यानंतर राहुल रामदास मेहेत्रे (रा. लोणी गवळी, ता. मेहकर) याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची वनकोठडी सुनावली. तपासादरम्यान गुन्ह्यात वापरलेले ट्रॅक्टर व कटर मशीन जप्त करण्यात आले.
१४५ सागवान वृक्षांची तोड उघड
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपवनसंरक्षक जमीर शेख यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी (संरक्षण) किशोर पडोळ यांना संबंधित वनक्षेत्र व लगतच्या परिसराची तपासणी करण्याचे निर्देश दिले. पडोळ व त्यांच्या पथकाने केलेल्या तपासणीत कक्ष क्रमांक १८१ मधील एकूण १४५ सागवान वृक्षांची तोड झाल्याचे निष्पन्न झाले. या लाकडाचे एकूण घनफळ ६४.९६० घनमीटर असून, त्याची किंमत ३५ लाख २६ हजार ४४९ रुपये आहे.
       वनक्षेत्रालगतच्या ई-क्लास महसुली जमिनीवरही ७६ वृक्षांचे ठुट आढळले. या लाकडाचे घनफळ ३९.६५३ घनमीटर असून, त्याची किंमत १७ लाख ९८ हजार २६१ रुपये असल्याचे तपासणीत समोर आले. वनक्षेत्रातून ८.८६ घनमीटर सागवान लाकूड, तर ई-क्लास क्षेत्रातून १.८ घनमीटर लाकूड घटनास्थळी आढळले. संबंधित लाकूड जप्त करण्यात आले.

* दुसऱ्या आरोपीला पाच दिवसांची वनकोठडी
        प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन पुढील तपासाची जबाबदारी सहाय्यक वनसंरक्षक वैभव काकडे यांच्याकडे सोपविण्यात आली. तपासादरम्यान वृक्षतोडीच्या कामात सहभागी मजुरांची चौकशी करण्यात आली. त्यातून भारत महादेव तिवाले (रा. दुर्गबोरी) याचे नाव समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. मेहकर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला पाच दिवसांची वनकोठडी सुनावली.
पुढील तपासात या प्रकरणातील सागवान लाकडाची तोड जुलै महिन्यापासून सुरू असल्याची माहिती समोर आली. भोसा येथून ट्रकद्वारे लाकूड नागपूरला नेऊन लाकूड आडतदारामार्फत विक्री केल्याचे तपासात उघड झाल्याचे वनविभागाने सांगितले. या अनुषंगाने नागपूर येथील एका लाकूड आडतदाराला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली. गुन्ह्यात वापरण्यात आलेले जेसीबी, टेम्पो ४०७, हायड्रा, ट्रॅक्टर, कटर मशीन व कुऱ्हाडी असा सुमारे ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

* वनकर्मचाऱ्यांचे निलंबन; दक्षता समितीची नियुक्ती
        या प्रकरणात निष्पक्ष तपास व्हावा, यासाठी संबंधित क्षेत्रात कार्यरत वनरक्षक व वनपाल यांना निलंबित करण्यात आले आहे. प्रकरणाची व्याप्ती व गांभीर्य लक्षात घेऊन मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) अमरावती ज्योती बॅनर्जी यांनी विभागीय वन अधिकारी (दक्षता) कमलेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे. वनविभागातील कर्मचाऱ्यांचा सहभाग आणि इतर संभाव्य आरोपींबाबत ही समिती सखोल चौकशी करून अहवाल सादर करणार आहे.

* ई-क्लास व आदिवासी जमिनीवरील तोडीचीही चौकशी
         संबंधित लाकूड व्यापाऱ्यांनी मागील वर्षात शासकीय ई-क्लास जमीन तसेच आदिवासींच्या खासगी जमिनीवरील झाडांची विनापरवाना तोड करून लाकडाची वाहतूक केल्याचेही तपासात निष्पन्न झाल्याचे वनविभागाने म्हटले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. ई-क्लास क्षेत्रातील वृक्षतोडीबाबत महसूल विभागाने डोणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडूनही तपास करण्यात येत आहे.

* दोषींवर कठोर कारवाई करणार : उपवनसंरक्षक जमीर शेख
       या प्रकरणाबाबत उपवनसंरक्षक जमीर शेख यांनी सांगितले की, बुलढाणा जिल्ह्यात शासकीय ई-क्लास जमिनीवर तसेच आदिवासींच्या खासगी जमिनीवर विनापरवाना वृक्षतोड होत असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणांची तपासणी करून सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी बुलढाणा यांना सादर करण्यात येणार असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

* नागरिकांना वनविभागाचे आवाहन
       शासकीय जमिनीवर अवैध वृक्षतोड होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
ही कारवाई मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) ज्योती बॅनर्जी व उपवनसंरक्षक जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक वैभव काकडे, वनपरिक्षेत्र अधिकारी (संरक्षण) किशोर पडोळ, वनपरिक्षेत्र अधिकारी आर. आर. सातपुते व इतर वनकर्मचाऱ्यांनी केली. प्रकरणाचा पुढील तपास वैभव काकडे करीत आहेत.