कुटुंबावरील हल्ले आणि जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे शेख जाकीर यांचा आमरण उपोषण !* पोलिस अधीक्षकांकडे न्याय व संरक्षणाची मागणी

कुटुंबावरील हल्ले आणि जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे शेख जाकीर यांचा आमरण उपोषण !
* पोलिस अधीक्षकांकडे न्याय व संरक्षणाची मागणी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
       बुलढाणा शहरातील जुनागाव भिलवाडा परिसरात राहणारे शेख जाकीर शेख हसन यांनी आपल्या कुटुंबाला न्याय व संरक्षण मिळावे, तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन सादर केले आहे. कुटुंबाला सतत शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्या कंटाळत ज़ाकिर यांनी कुटुंबासह अमारण उपोषण सुरु केले आहे.

        शेख जाकीर यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या एक-दोन महिन्यांपासून शेजारी राहणाऱ्या काही व्यक्तींकडून त्यांच्या कुटुंबाला त्रास दिला जात आहे. या प्रकरणासंदर्भात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. संबंधित व्यक्ती लोखंडी रॉड व लाठ्या घेऊन घरात घुसून मारहाण करीत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. ५ ऑक्टोबरच्या हल्ल्यात कुटुंबातील तिघे जण जखमी झाले होते.  या हल्ल्यात शेख जाकीर यांची आई, वडील, भाऊ गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चार ते पाच दिवस रुग्णालयात उपचार सुरू असतानाही पोलिसांकडून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी कर्मचारी आला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
        संबंधितांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे सांगूनही अपेक्षित कारवाई होत नसल्याने त्रास वाढत असल्याची भावना शेख जाकीर यांनी व्यक्त केली आहे. वारंवार होणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे संपूर्ण कुटुंब भयभीत असल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी
          या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, आपल्या कुटुंबाला संरक्षण द्यावे आणि न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेख जाकीर शेख हसन यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.