हार-जीत होत राहते, सोबत असणाऱ्यांचे स्मरण ठेवले पाहिजे* शिवसेना उमेदवार डी.एस. लहाने यांनी मानले आभार!

हार-जीत होत राहते, सोबत असणाऱ्यांचे स्मरण ठेवले पाहिजे
* शिवसेना उमेदवार डी.एस. लहाने यांनी मानले आभार!
अमरावती : (एशिया मंच न्यूज )
         अमरावती विभागीय शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेले दत्तात्रय लहाने (डी.एस.) यांनी निवडणुकीच्या समाप्तीनंतर समस्त शिक्षक मतदार आणि पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहे. प्रचारासाठी फारसा वेळ मिळाला नसतानाही शिक्षक मतदारांनी दिलेली साथ अत्यंत मोलाची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

       ​आपल्या साध्या आणि नम्र स्वभावामुळे 'जमिनीवर पाय असणारे नेते' अशी ओळख असलेले दत्तात्रय लहाने सर यांनी शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी अत्यंत अल्प वेळ मिळाला, परंतु या कमी अवधीतही शिक्षक मतदारांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास आणि दिलेली उत्तम साथ हीच आपल्यासाठी सर्वात मोठी कमाई असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकी दरम्यान अमरावती विभागातील
​बुलडाणा,​ अकोला,​ अमरावती, वाशिम,​ यवतमाळ सर्वच ठिकाणी शिवसेना पक्षाचे वरिष्ठ नेते, सामान्य शिवसैनिक आणि शिक्षक बंधू-भगिनींनी अहोरात्र मेहनत घेत झटून काम केले. या सर्व सहकाऱ्यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही, अशा शब्दांत त्यांनी आभार मानले.
​लोकशाही प्रक्रियेत हार-जीत ही होतच राहते, या वास्तवाचा पुनरुच्चार करत दत्तात्रय लहाने यांनी अत्यंत संयमी आणि सुसंस्कृत भूमिका मांडली.
        ​जे - या प्रवासात आपल्या सोबत खंबीरपणे उभे राहिले, त्यांचे स्मरण आपण नेहमी ठेवले पाहिजे. तसेच, जे विविध कारणांमुळे सोबत येऊ शकले नाहीत, त्यांच्याबद्दल मनात अजिबात दुराग्रह असू नये असे, ते एशिया मंच न्यूज च्या प्रतिनिधी शी बोलतांना म्हणाले.
----------------------------------------------