-----------------------
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
नायलॉन मांजामुळे दरवर्षी नागरिक जखमी होण्याबरोबरच काहींचा मृत्यूही होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाच्या वापरास, विक्रीस, साठवणुकीस तसेच वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यासंदर्भात दिलेल्या आदेशानुसार नायलॉन मांजाविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने SMPIL No. 9/2021 मधील आदेशानुसार नायलॉन मांजाचा वापर अद्याप मोठ्या प्रमाणावर होत असल्याची बाब गंभीरपणे घेतली आहे. नायलॉन मांजाचा वापर करणारे तसेच त्याची विक्री करणारे विक्रेते यांच्याकडून न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन होत असल्याने संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडविताना आढळून आल्यास संबंधित व्यक्तीस २५ हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. अल्पवयीन व्यक्ती नायलॉन मांजाचा वापर करताना आढळल्यास ही रक्कम त्याच्या पालकांकडून वसूल करण्यात येईल. त्याचप्रमाणे, नायलॉन मांजा विक्रीसाठी बाळगलेला आढळल्यास संबंधित विक्रेत्यास २ लाख २५ हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे. नायलॉन मांजा संदर्भातील उल्लंघनासाठी संबंधित व्यक्ती अथवा अल्पवयीन व्यक्तीच्या पालकांकडून २५ हजार रुपये, तर संबंधित विक्रेत्याकडून २ लाख ५० हजार रुपयांपर्यंत दंड स्वतंत्रपणे वसूल करण्यात येणार आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नायलॉन मांजाचा पतंग उडविण्यासाठी वापर, विक्री, साठवणूक व वाहतूक याबाबत सर्व संबंधितांना नियमावली तयार करण्याचे निर्देश देण्यात आले असून, नायलॉन मांजाचा वापर कायमस्वरूपी बंद होण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
याबाबत पोलीस अधीक्षक, बुलडाणा आणि जिल्हाधिकारी, बुलडाणा यांच्यामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. नागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर, विक्री अथवा साठवणूक करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
