पोहरादेवी येथे ५ नोव्हेंबरला गोदान महासोहळा* १००१ गाय-वासरांचे गोदान; महादीपोत्सवाने उजळणार बंजारा काशी

पोहरादेवी येथे ५ नोव्हेंबरला गोदान महासोहळा
* १००१ गाय-वासरांचे गोदान; महादीपोत्सवाने उजळणार बंजारा काशी 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
       बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र पोहरादेवी, जि. वाशिम येथे वसुबारसच्या मुहूर्तावर ऐतिहासिक गोदान महासोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय बंजारा (लमाणी) शक्तीपीठाच्या पुढाकाराने ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता हा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे, अशी माहिती सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक यु. के. जाधव यांनी २७ सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 
       तपस्वी धर्मगुरु संत रामराव महाराज यांचे उत्तराधिकारी धर्मगुरु बाबुसिंग महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा महासोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यात धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम पार पडणार आहेत. पहिले गोरक्षक संत सेवालाल महाराज, गोदान संवाद यात्रा, राज्यमाता गोमाता १००१ गाय-वासरांचे महापूजन, महादीपोत्सवा दरम्यान महाआरती आणि एक लाख एक दिव्यांची रोषणाई, १००१ गाय-वासरांचे गोदान, गोसेवा व संस्कृती संवर्धनाचा संकल्प करण्यात येणार आहे. बंजारा संस्कृती आणि गोवंशाचे नाते अनादी काळापासून अविभाज्य राहिले आहे. गोसेवा, गोसंवर्धन आणि गोरक्षणाचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. वसुबारस व भाऊबीजेच्या पावन पर्वावर १००१ गोदानाचा ऐतिहासिक संकल्प पूर्ण केला जाणार आहे. आगामी काळात तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे तब्बल १ लाख २५ हजार गोदानाच्या व्यापक राष्ट्रव्यापी उपक्रमाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या महामहोत्सवात विविध जिल्ह्यांतील संत-महंत, गोपालक, गोरक्षक, गोशाळा संचालक आणि समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन धर्मगुरु बाबुसिंग महाराज, पोहरादेवी संस्थानचे सर्व संत-महंत, यु. के. जाधव व आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.