गौरीच्या सजावटीतून ‘महिला हक्कांचा’ जागर !* गाडेकर परिवाराचा आठ वर्षांपासून समाजप्रबोधनाचा अनोखा उपक्रम * यंदा कायद्याच्या माध्यमातून महिलांना अधिकारांची जाणीव

गौरीच्या सजावटीतून ‘महिला हक्कांचा’ जागर !
* गाडेकर परिवाराचा आठ वर्षांपासून समाजप्रबोधनाचा अनोखा उपक्रम 
 * यंदा कायद्याच्या माध्यमातून महिलांना अधिकारांची जाणीव
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
          गौरी-गणपतीचा उत्सव म्हटला की घराघरांत सजावट, आकर्षक देखावे आणि धार्मिक वातावरण पाहायला मिळते. मात्र, केळवद येथील सौ. वैष्णवी रविकांत गाडेकर व गाडेकर परिवाराने या पारंपरिक उत्सवाला समाज प्रबोधनाची विधायक दिशा देत एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. सन २०१९ पासून सातत्याने विविध सामाजिक विषयांवर आधारित संदेशपर गौरी सजावट व देखावे साकारून समाज जागृती करण्याचा उपक्रम सुरू आहे. यंदा ‘महिला हक्क आणि कायदा’ या विषयाची प्रभावी मांडणी करून महिलांच्या अधिकारांचा जागर करण्यात आला आहे.

         गौरी सजावट ही केवळ आकर्षणाचे माध्यम न राहता समाजाला विचार करायला लावणारे प्रभावी व्यासपीठ ठरावे, या उद्देशाने गाडेकर परिवाराकडून दरवर्षी वेगवेगळ्या सामाजिक विषयाची निवड केली जाते. आतापर्यंत हरित पर्णकुटीच्या माध्यमातून निसर्ग संवर्धन, कोरोना काळातील डॉक्टर व पोलिसांचे कर्तव्य, स्त्रीशक्तीचा जागर, स्त्री शिक्षण, ‘लेक वाचवा-लेक शिकवा’ आणि ओला दुष्काळातील शेतकऱ्यांच्या वेदना अशा विषयांवर देखावे सादर करण्यात आले आहेत.
     यंदाच्या देखाव्याचा विषय ‘महिला हक्क आणि कायदा’ असून, महिलांना आपल्या हक्कांची व कायदेशीर अधिकारांची माहिती असणे किती महत्त्वाचे आहे, हे प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले आहे. अन्याय सहन न करता त्याविरोधात आवाज उठविण्याचे धैर्य, कायद्याची माहिती आणि संविधानाने दिलेल्या अधिकारांची जाणीव महिलांमध्ये निर्माण व्हावी, हा या देखाव्यामागील मुख्य उद्देश आहे. ‘जागरूक महिला म्हणजे सक्षम महिला आणि सक्षम महिला म्हणजे सशक्त समाज’ हा विचार या माध्यमातून समाजासमोर मांडण्यात आला आहे.

* वकिली क्षेत्रातील अनुभवातून साकारली संकल्पना : 

         यंदाच्या संकल्पनेला आणखी विशेष महत्त्व आहे. वकिली क्षेत्रात कार्यरत असलेल्या सौ. वैष्णवी रविकांत गाडेकर यांच्या संकल्पनेतून ‘महिला हक्क आणि कायदा’ हा संदेशपर देखावा साकारण्यात आला आहे. महिलांनी आपल्या अधिकारांबाबत जागरूक राहावे आणि कायद्याचे संरक्षण मिळविण्यासाठी आवश्यक ते पाऊल उचलावे, यासाठी या विषयाची निवड करण्यात आली. ही संकल्पना प्रत्यक्ष देखाव्यात उतरविण्यासाठी प्रमोद ठेग यांच्यासह संपूर्ण गाडेकर परिवाराने कल्पकता, मेहनत आणि अथक परिश्रम घेतले.

* सणाच्या आनंदासोबत सामाजिक बांधिलकीचा संदेश : 

         गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने सुरू असलेल्या या उपक्रमातून ‘उत्सव केवळ साजरा न करता त्यातून समाजालाही काहीतरी देऊया’ हा सकारात्मक विचार पुढे आला आहे. धार्मिक परंपरा जपत सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्याची ही कल्पक संकल्पना निश्चितच अनुकरणीय ठरत आहे. गौरीच्या सजावटीतून महिलांच्या हक्कांचा आवाज बुलंद करण्याचा गाडेकर परिवाराचा हा प्रयत्न केवळ सजावट नाही, तर समाजाच्या मनात जागृतीची ज्योत पेटविणारा उपक्रम ठरत आहे.