धोंडी धोंडी पाणी दे...! कवठळच्या महिलांचा आक्रोश....* पिके वाळण्याच्या मार्गावर, विजेच्या लपंडावाने शेतकरी हैराण, महादेवाला केला जलाभिषेक

धोंडी धोंडी पाणी दे...! 
कवठळच्या महिलांचा आक्रोश....
* पिके वाळण्याच्या मार्गावर, विजेच्या लपंडावाने शेतकरी हैराण, महादेवाला केला जलाभिषेक 
चिखली : (एशिया मंच न्यूज )
         गेल्या ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील कवठळ परिसरातील शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. पावसाअभावी पिके वाळण्याच्या मार्गावर आली असून, त्यातच विजेचा लपंडाव व अनियमित लोडशेडिंगमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. या गंभीर परिस्थितीने व्यथित झालेल्या कवठळ येथील महिलांनी आता ‘धोंडी धोंडी पाणी दे...’ अशी आर्त हाक देत देवाकडे धाव घेतली.
         आज 18 सप्टेंबर रोजी महिलांनी गावातून पाण्याने भरलेले हांडे-भांडे डोक्यावर घेऊन मिरवणूक काढली. त्यानंतर महादेवाचा जलाभिषेक करून परिसरात जोरदार पाऊस पडावा आणि वाळत चाललेल्या पिकांना जीवदान मिळावे, अशी प्रार्थना केली.

       कवठळ परिसरातील पावसाअभावी नुकसान झालेल्या पिकांचे सरकार व प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरघोस आर्थिक मदत द्यावी, अशी  मागणी महिलांनी केली आहे.
पिके वाळून गेल्यानंतर पंचनामे करण्यापेक्षा प्रशासनाने आताच शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून परिस्थितीची पाहणी करावी, अशी मागणीही महिलांनी केली आहे.
         शेतीसाठी नियमित व सुरळीत वीजपुरवठा करावा, अनियमित लोडशेडिंग थांबवावे आणि शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महिलांनी केली आहे.
        महागडी बियाणे, खते, औषधे व मशागतीचा खर्च करून शेतकऱ्यांनी पिके उभी केली आहेत. मात्र पावसाने पाठ फिरवल्याने आणि विजेच्या अनियमित पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
       सरकारने आता तरी जागे व्हावे. शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पिके वाळत आहेत. तातडीने पंचनामे करून भरघोस मदत द्यावी, अशी संतप्त मागणी कवठळच्या महिलांनी केली आहे.
        महादेवाच्या चरणी घातलेले हे साकडे केवळ पावसासाठी नसून, शेतकऱ्यांच्या जगण्याचा आक्रोश आहे. आता तरी सरकार आणि प्रशासन हा आक्रोश ऐकणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.