वायूवेग पथकाच्या तत्परतेने जखमीस मिळाले उपचार
* आरटीओ यांच्या सुचनांचे पालन
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या पाच वायूवेग पथकांनी कर्तव्यासोबतच सामाजिक बांधिलकी जोपासत 'झिरो अवर'मध्ये अपघातातील जखमींना जीवदान देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. खडकी फाट्यावर अपघातात जखमी झालेल्या एका वृद्ध महिलेस वायूवेग पथकाने आपल्या वाहनाद्वारे तत्काळ बुलढाणा येथील रुग्णालयात पोहोचविल्याने वेळेत उपचार मिळाले.
कर्तव्यावर असताना कुठे अपघात झाला असेल तर सर्व कामे सोडून 'झीरो अवर'मध्ये जखमींना तत्काळ मदत मिळण्यासाठी त्याला रुग्णालयात पोहोचवा, अशा सक्त सूचना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पवन नव्हाडे यांनी दिल्या आहेत. त्याचे पालन पाचही वायूवेग पथकातील मोटार वाहन निरीक्षकांकडून केला जात आहे. जिल्ह्यात आरटीओ कार्यालयाची पाच वायूवेग पथके तैनात आहेत. ४ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता बुलढाणा ते मलकापूर मार्गावर वायूवेग पथक -१ नियमित तपासणी करीत होते. यावेळी मोताळा तालुक्यातील खडकी फाट्याजवळ दुचाकीला अपघात होऊन मंगला पुरी (वय ६०) या जखमी असल्याचे आढळून आले. यावेळी अन्य वाहन मदतीसाठी उपलब्ध नसल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वायूवेग पथकाने आपल्या इंटरसेप्टर या शासकीय वाहनात जखमी महिलेस तातडीने बुलढाणा येथील डॉ. निकम हॉस्पिटल पोहोचविले. त्यामुळे जखमी महिलेस वेळेत उपचार मिळाले. पथकातील जितेंद्र सोनवणे, आशिष इंगळे, सुदर्शन जायभाये यांनी अपघातग्रस्त महिलेस रुग्णालयात दाखल करण्यासाठी तत्परता दाखवून मोलाची मदत केली. यावेळी मोटर वाहन निरीक्षक शीतलकुमार कुंभार हे देखील हजर होते.
