प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध ; 30 सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती नोंदविता येणार
* जिल्हयात १८ लाख ९९ हजार ०२८ मतदार
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघांची प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यातील मतदारांना प्रारूप यादीतील आपले नाव तपासता येणार असून, नावाबाबत दावे व हरकती नोंदविण्यासाठी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत संधी देण्यात आली आहे.
भारत निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये व ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमाचा दुसरा टप्पा जाहीर केला असून, त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा समावेश आहे. या प्रक्रियेत प्रत्येक पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट राहण्यासाठी संबंधित व्यक्ती भारताचा नागरिक असणे आणि वयाची १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
* जिल्ह्यात 18 लाखांहून अधिक मतदार :
३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत बुलढाणा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघांमध्ये एकूण १८ लाख ९९ हजार ०२८ मतदार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामध्ये पुरुष मतदार ९ लाख ९१ हजार ४१३, महिला मतदार ९ लाख ०७ हजार ५८८ आणि इतर मतदार २७ आहेत.
* विधानसभा मतदारसंघनिहाय प्रारूप मतदारसंख्या :
२१-मलकापूर : २ लाख ५८ हजार ४०७, २२-बुलढाणा : २ लाख ४९ हजार ०६४, २३-चिखली : २ लाख ६७ हजार ३२६, २४-सिंदखेडराजा : २ लाख ९१ हजार २४६, २५-मेहकर : २ लाख ८२ हजार ४७१, २६-खामगाव : २ लाख ७५ हजार ५३५, २७-जळगाव जामोद : २ लाख ७४ हजार ९७९
* मतदार केंद्रांच्या सुसूत्रीकरणानंतर २३०१ केंद्रे
मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरण प्रक्रियेनंतर जिल्ह्यात एकूण २३०१ मतदान केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यामध्ये नवीन तयार करण्यात येणारी मतदान केंद्रे, मतदान केंद्रांचे विभाजन, विलीनीकरण, नावातील बदल तसेच ठिकाणातील बदल करण्यात आले आहेत.
मलकापूर मतदार संघात ७ नवीन केंद्रे, बुलढाण्यात १, सिंदखेडराजात २, खामगावमध्ये २ आणि जळगाव जामोद मतदार संघात २ नवीन मतदान केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत. एकूण १४ नवीन मतदान केंद्रे तयार करण्यात येणार आहेत. तसेच काही केंद्रांचे विभाजन, विलीनीकरण, नाव व ठिकाणात बदल प्रस्तावित आहेत.
* दावे-हरकतींसाठी संधी :
प्रारूप मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा नावातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी मतदारांना विहित नमुन्यात अर्ज करता येणार आहे. संबंधित मतदार संघातील मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात तसेच तहसीलदार व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात दावे व हरकती स्वीकारल्या जातील.
विशेष सखोल पुनरिक्षणाच्या सुधारित वेळापत्रकानुसार प्रारूप मतदार यादीची प्रसिद्धी ३१ ऑगस्ट २०२६, दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६, तर नोटीस टप्प्यातील दावे-हरकतींच्या निकालाची प्रक्रिया ३१ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत होणार आहे. अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
* मतदारांसाठी हेल्प डेस्क व ऑनलाइन सुविधा :
मतदारांना विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी जिल्हास्तरावर मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात मदत कक्ष (Help Desk) सुरू करण्यात आला आहे. नागरिकांना आपल्या नावाची मतदार यादीतील नोंद, दुरुस्ती अथवा इतर बाबींबाबत येथे माहिती घेता येणार आहे. तसेच मतदारांना ECINET App च्या माध्यमातून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याशी संपर्क साधण्यासाठी ‘Book a Call with BLO’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव तपासावे. नाव नसल्यास किंवा नाव, पत्ता अथवा अन्य तपशिलात त्रुटी असल्यास विहित कालावधीत दावे व हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.
