* बुलढाण्यात गीत गायनाचा कार्यक्रम
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त शनिवार 15 ऑगस्ट रोजी शाहीर, कवी, गायक, कलावंतांनी महापुरुषांच्या जीवनचरित्रावरील गीत हुतात्मा स्मारक परिसर बुलढाणा येथे सादर केली.
याप्रसंगी सुरवातीला महाकवी वामनदादा कर्डक यांच्या पुतळ्यास व महामानवांच्या प्रतिमांना उपस्थित मान्यवरांनी हार अर्पण केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर, भूमी मुक्ती मोर्चा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई प्रदीप अंभोरे, समतेचे निळे वादळ संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव दाभाडे, एड.गणेश इंगळे, दामोदर बिडवे, प्रा.आर. आर. वानखेडे, पी.आर. इंगळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष पवन भालेराव, विजय मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी झालेल्या गीत गायनाच्या कार्यक्रमात सर्वप्रथम सुप्रसिद्ध गायक विजय मांडकेकर यांनी वंदन गीत सादर केले. त्यानंतर शाहीर शिवाजी लहाने, कवी गायक सारंग बंधू, गायक प्रदीप गवई, गायिका कमल भालेराव, गायक, पत्रकार संजय निकाळजे, गायिका सुनीता काकडे, गायक सुरेश अवसरमोल, प्रतीक वानखेडे यांच्यासह जिल्हाभरातून आलेल्या शाहीर, कवी, गायक व कलावंतांनी गीत सादर केली. तर गणेश बंधू व अमोल जायभाये यांनी लावणी सादर केली.
या संगीतमय कार्यक्रमाला हार्मोनियम शाहीर भिवाजी पवार, बॅन्जो गौतम वानखेडे, ढोलकी व दबला गवई यांनी साथ दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्यिक सुरेश साबळे यांनी केले. संचलन शाहीर डी. आर. इंगळे यांनी केले तर पत्रकार सिद्धार्थ आराख यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या तत्पूर्वी शहरातून कलावंतांची पारंपारिक वेशभूषेत व वाद्यासह मिरवणूक निघाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.प्रवीणकुमार देवरे यांनी मिरवणुकीत सहभाग घेऊन वामनदादांच्या प्रतिमेस अभिवादन केले. या कार्यक्रमाला विविध ठिकाणचे भजनी मंडळ, महाकवी वामनदादा कर्डक बहुउद्देशीय प्रतिष्ठान बुलढाणा तथा वामनदादा कर्डक प्रेमी व आयोजन समिती सदस्य यांनी सहकार्य व परिश्रम घेतले.
