केवळ डॉक्टर, इंजिनिअरच का? शासकीय अधिकारी होण्याचेही स्वप्न पहा ! – तहसीलदार कुमरे
* शिवसाईच्या विद्यार्थ्यांना प्रशासकीय धड्यांसोबत प्रेरणादायी संदेश
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
रोजच्या वर्गातील पुस्तकी अभ्यासाच्या पलीकडे जाऊन प्रशासनाचा कारभार कसा चालतो? लोकसेवेचे कार्य कसे घडते? हे समजून घेण्यासाठी शिवसाई युनिव्हर्सल स्कूल, बुलढाणा च्या विद्यार्थ्यांनी आज थेट तहसील कार्यालयात पाऊल ठेवले. या अनोख्या क्षेत्रभेटीने विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना एक नवी आणि उंच भरारी घेण्याची दिशा दिली आहे.
विद्यार्थ्यांच्या मनातील प्रशासकीय कामांविषयीची उत्सुकता जाणून घेण्यासाठी आज ५ ऑगस्ट २०२६ रोजी शाळेच्या वतीने या विशेष भेटीचे आयोजन करण्यात आले होते. या भेटीदरम्यान तहसीलदार कुमरे, नायब तहसीलदार सुनील आहेर यांनी स्वतः वेळ काढून विद्यार्थ्यांशी अत्यंत आपुलकीने संवाद साधला.
* पुष्पगुच्छ देऊन स्वागत व आभार प्रदर्शन :
कार्यक्रम प्रसंगी तहसीलदार व नायब तहसीलदार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत विद्यार्थिनी चेताली हाडे व स्नेहश्री राठोड यांनी केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आभार प्रदर्शन विद्यार्थी अफान खान याने मानले.
* सखोल मार्गदर्शन व मनमोकळा संवाद :
तहसील कार्यालयाचे कामकाज कसे चालते, विविध विभाग कसे कार्यरत असतात आणि शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत कशा पोहोचवल्या जातात, याची अतिशय सखोल आणि रंजक माहिती दोन्ही अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना दिली. संवादा दरम्यान विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांच्या शिक्षण, स्पर्धा परीक्षांचा (MPSC) प्रवास आणि आव्हानांबद्दल अनेक प्रश्न विचारले. तहसीलदार व नायब तहसीलदारांनी विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे निरसन करत त्यांना अतिशय उत्कृष्ट व सोप्या भाषेत उत्तरे दिली.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तहसीलदार म्हणाले, बहुतांश मुले लहानपणापासून फक्त डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याचेच स्वप्न पाहतात; पण देशाची आणि समाजाची थेट सेवा करण्यासाठी शासकीय अधिकारी (MPSC/UPSC) होण्याचे स्वप्नही विद्यार्थ्यांनी आवर्जून पाहिले पाहिजे! यासोबतच आयुष्यात अभ्यासाइतकेच खेळांचे महत्त्व किती आहे, हेही त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. हा संपूर्ण अनुभव इयत्ता ८ वीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक ठरला. या यशस्वी व उपक्रमशील क्षेत्रभेटीचे आयोजन शिवसाई युनिव्हर्सल स्कूलचे प्राचार्य प्रमोद मोहरकर, वर्गशिक्षिका सौ. वंदना चव्हाण व क्षेत्रभेट मार्गदर्शक उबाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
