शेगाव मेळाव्यात दिसले एकजुटीचे दर्शन...
* शिक्षकांचा सन्मान अबाधित ठेवलाच पाहिजे : प्रा. लहाने
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
शिक्षक मतदार संघाची निवडणूक शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी महत्वाची ठरते. गेल्या काही वर्षापासून शिक्षक वेगवेगळ्या पातळ्यांवर अडचणीत आला आहे. शिक्षकांचा सन्मान अबाधित राखला गेला पाहिजे, यासाठी कटिबद्ध असल्याचे शिवसेना नेते प्रा. डी. एस. लहाने म्हणाले, शेगाव येथील शिक्षक मेळाव्यात ते बोलत होते. शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यातील शेकडो शिक्षकांच्या भरगच्च उपस्थीने या मेळाव्यात एकजुटीचे अनोखे दर्शन घडले.
शेगाव येथील माऊली मंगल कार्यालय येथे शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पी. एन. कोल्हे होते. तर सुधीर मानकर, गजानन काळे, प्रमोद येऊल, गजानन पैकट , गणेश सांगूनवेडे, मधुकर रौंदळे, सुधाकर देशमुख, प्राचार्य बकाल यांची विशेष उपस्थिती लाभली.
शिक्षकांना येणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रा. डी. एस. लहाने यांनी ठिकठिकाणी मेळाव्यांचे आयोजन केले आहे. स्वतः शिक्षक असल्याने शिक्षकांच्या समस्या त्यांना चांगल्याच माहित आहे. शिक्षक मतदार संघाची निवडणूक पुढ्यात आहे, त्यामुळे मेळाव्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. पुढे बोलताना ते म्हणाले, संस्थेचे नॉन सॅलरी अनुदान बंद करण्यात आले आहे. यामुळे संस्थांची मोठी अडचण झाली आहे. ज्या भौतिक सोयी सुविधा उपलब्ध केल्या जायच्या त्याला खीळ बसत आहे. संच मान्यता सारखे अडचणीचे निकष शिक्षकांच्या मुळावर उठले आहे. एकीकडे उच्च पदवी घेऊन देखील पीएचडी झालेल्या प्राध्यापकाला नोकरी मिळत नाही. दहा, वीस हजार रुपये पगारावर तो काम करतो ही गोष्ट भूषणावह नाही. शिक्षकांना क्षमतेप्रमाणे रोजगार मिळाला पाहिजे, असे सांगून शिक्षक अडचणी सोडवण्यास आपला प्राधान्यक्रम असल्याचे ते म्हणाले. प्रास्तविक शिक्षक मानकर यांनी तर आभार प्राचार्य बकाल यांनी मानले. यावेळी पी. एन. कोल्हे यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक मिश्रा यांनी केले. शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद तिन्ही तालुक्यातून शेकडोच्या संख्येने शिक्षकांची उपस्थिती लाभली. एकूणच शेगाव मेळावा शिक्षक एकजुटीचे मजबूत दर्शन घडवून गेला.
