* नागरिकांच्या प्रश्नांना दिले समाधानकारक उत्तर
पिंपळगाव राजा : (एशिया मंच न्यूज )
भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमांतर्गत उपविभागीय अधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी शनिवारी पिंपळगाव राजा येथे भेट देऊन सुरू असलेल्या मतदार यादी पुनरिक्षणाच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), पर्यवेक्षक व संबंधित कर्मचाऱ्यांकडून कामाचा सविस्तर आढावा घेत विविध नोंदी, गणनापत्रके व कागदपत्रांची तपासणी केली.
आयोजित बैठकीत डॉ. पुरी यांनी उपस्थित नागरिकांशी थेट संवाद साधत SIR प्रक्रियेबाबत त्यांच्या शंका व प्रश्न जाणून घेतले. बैठकीत सामाजिक कार्यकर्ते ओवेस उल्ला खान यांनी मतदार नोंदणी प्रक्रियेसंदर्भातील अनेक प्रश्न उपस्थित केले, तर सामाजिक कार्यकर्ते शेख झुलकर शेख चांद यांनीही नागरिकांच्या अडचणी मांडत स्पष्टीकरणाची मागणी केली.
यावेळी सर्व प्रश्नांना उत्तर देताना उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी स्पष्ट केले की, "सध्या नागरिकांनी प्रथम शंभर टक्के फॉर्म भरून जमा करावेत. त्यामुळे कोणाचेही नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही. त्यानंतर पुढील टप्प्यात आवश्यक त्या त्रुटी, दुरुस्त्या व इतर समस्या नियमानुसार सोडविता येतील." त्यांच्या या स्पष्टीकरणामुळे उपस्थित नागरिकांच्या अनेक शंकांचे निरसन झाले.
डॉ. पुरी यांनी BLO यांना काम करताना येणाऱ्या अडचणी समजून घेत आवश्यक मार्गदर्शन केले. मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम अचूक, पारदर्शक व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देत प्रत्येक पात्र मतदाराची नोंद सुनिश्चित करण्यावर भर दिला. तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी आणि BLO यांनी परस्पर समन्वय राखून कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन केले.
यावेळी पिंपळगाव राजा सरपंच शेख शाकीर शेख चांद, सामाजिक कार्यकर्ते ओवेस उल्ला खान, शेख झुलकर शेख चांद, मोहम्मद हसन इनामदार, सचिन भाऊ, मुन्ना मुल्लाजी, सका उल्ला खान तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी, BLO आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
