* पक्ष विस्तार, एसआयआर प्रक्रिया आणि आगामी निवडणुकांवर मंथन
* शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची जिल्हा पदाधिकारी बैठक उत्साहात
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
गद्दार सोडून गेले तरी पक्ष संघटना आहे तिथेच जबाबदारीने आणि निष्ठेने काम करत आहे. हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांमुळे पक्षाची पाळंमुळं आज जनमानसांमध्ये खोलवर रुजलेली आहेत. उद्धव साहेब यांचे हात मजबूत करण्यासाठी पक्ष विस्ताराच्या अनुषंगाने झोकून देऊन कामाला लागा असे आवाहन जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनी केले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची बुलढाणा जिल्हा पदाधिकारी बैठक रविवारी १२ जुलै रोजी बुलढाणा रेसिडेन्सी येथे उत्साहात पार पडली. बैठकीला मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, जिल्हाप्रमुख गजानन वाघ, राज्यप्रवक्ता जयश्रीताई शेळके, सहसंपर्कप्रमुख डी. एस. लहाने, सहसंपर्कप्रमुख दत्ताभाऊ पाटील, सहसंपर्क प्रमुख वसंतराव भोजने, जिल्हा संघटक सुमित सरदार, युवासेना जिल्हाप्रमुख नंदूभाऊ कऱ्हाडे, शुभम पाटील, मेहकरचे नगराध्यक्ष किशोर गारोळे, वसंतराव झाल्टे, गजानन धांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत पक्ष विस्तार, आगामी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची तयारी तसेच निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विशेष मतदार यादी पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेत पक्षाच्या बूथ लेव्हल एजंट (BLA) यांनी सक्रिय सहभाग घेण्याबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी सांगितले,की पक्षाच्या पातळीवर "संपूर्ण महाराष्ट्रात BLA नियुक्तीमध्ये बुलढाणा जिल्ह्याचे काम आघाडीवर आहे. ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. संघटनात्मक कामासाठी देखील सर्वांनी एकत्रित पुढाकार घेऊन काम करावे, असे आवाहन केले.
मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा आमदार म्हणून जनतेने दाखविलेला विश्वास आपण पावसाळी अधिवेशनात सार्थकी लावला. जनहिताच्या विविध विषयांवर शासनाला धोरणात्मक निर्णय घेण्यास भाग पाडणे हेच माझे कर्तव्य आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना विचार आणि निष्ठेच्या पायावर केली आहे. मूठभर लोक पक्ष सोडून गेल्याने शिवसेना संपणार नाही.
* निष्ठावंतांमुळे संघटना बांधणीला जोर : जालिंदर बुधवत
जिल्हाप्रमुख जालिंधरभाऊ बुधवत यांनी सांगितले की, "भाजपाने राम मंदिर देणगीमध्ये केलेल्या कथित घोटाळ्याविरोधात संपूर्ण महाविकास आघाडीने एकत्रितपणे लढा उभारण्याची गरज आहे. तसेच आगामी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आतापासून कामाला लागावे. पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करावा. यामध्ये रक्तदान शिबिर, वृक्षारोपण , रुग्णांना फळ वाटप व अन्य उपक्रम राबवावेत. पक्ष वाढीसाठी केवळ सोशल मीडियावर सक्रिय राहून उपयोग नाही; प्रत्यक्ष जनसंपर्क वाढविणे अधिक महत्त्वाचे आहे.
पक्षाला सोडून गेलेले आमदार-खासदार म्हणजे शिवसेना नव्हे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या विचारांचे आणि बाळकडूचे बळ आजही शिवसैनिकांमध्ये आहे. मातोश्री निष्ठेमुळे आणि त्याच बळावर शिवसेनेचा झंझवात पुढे जात आहे. असे सांगितले.
* संघर्षाला शस्त्र बनवण्याची हीच खरी वेळ : जयश्रीताई शेळके
पक्ष प्रवक्ता ॲड. जयश्रीताई शेळके म्हणाल्या, पक्षातील आमदार-खासदार पक्ष सोडून गेले असले तरी आजही सामान्य शिवसैनिक पक्षासोबत ठामपणे उभा आहे. जवळचा माणूस सोडून गेल्याचे दुःख निश्चित आहे; मात्र आता त्याच दुःखाला संघर्षाचे शस्त्र बनविण्याची वेळ आली आहे. जोपर्यंत सेनापती युद्धभूमीवर लढत आहे, तोपर्यंत सैन्याचा पराभव होणे अशक्य आहे. जोपर्यंत निष्ठावान शिवसैनिक पक्षासोबत आहेत, तोपर्यंत शिवसेना कोणीही संपवू शकत नाही. सत्ता कायम बदलत असते. आपलीही वेळ निश्चित येईल, यात कोणतीही शंका नाही.
प्रारंभी प्रा. सिद्धेश्वर आंधळे यांनी प्रबोधनातून विचार मंथन घडवून आणले. यावेळी जिल्हाप्रमुख गजानन वाघ, सह संपर्कप्रमुख दत्ता पाटील, डी. एस. लहाने यांनी देखील मार्गदर्शन केले. यावेळी सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, शहरप्रमुख, उपशहरप्रमुख आणि अंगीकृत संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, उपस्थित होते.
