अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त राज्यातील शासनमान्य वृत्तपत्रांना दर्शनी जाहिरात द्यावी – प्रदीप कुलकर्णी

अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त राज्यातील शासनमान्य वृत्तपत्रांना दर्शनी जाहिरात द्यावी – प्रदीप कुलकर्णी
माजलगाव : (एशिया मंच न्यूज )
       लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती १ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर साजरी होत असून, महाराष्ट्र शासनाने हा दिवस 'लेखन प्रेरणा दिन' म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयाचे स्वागत करत, अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्याचा एक भाग म्हणून राज्यातील शासनमान्य जाहिरात यादीवरील सर्व वृत्तपत्रांना शासनाने दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी, अशी मागणी असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

          कुलकर्णी यांनी निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने परिपत्रकाद्वारे अण्णाभाऊ साठे यांची जयंती तालुका व जिल्हास्तरावर उत्साहात साजरी करण्याच्या सूचना सर्व शासकीय कार्यालयांना दिल्या आहेत. तसेच १ ऑगस्ट हा दिवस राज्यभर लेखन प्रेरणा दिन म्हणून पाळण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. हा निर्णय साहित्य, सामाजिक जाणीव आणि लेखन संस्कृतीला चालना देणारा असून त्याचे स्वागत केले पाहिजे.

        याच औचित्याने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आणि राज्यातील लघु व मध्यम वृत्तपत्रांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने शासनमान्य जाहिरात यादीवरील सर्व नियमित वृत्तपत्रांना दर्शनी शासकीय जाहिरात वितरित करावी, अशी मागणी कुलकर्णी यांनी केली आहे.

        अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा व साहित्याचा व्यापक प्रसार व्हावा, तसेच शासनाच्या जनजागृतीपर संदेशांनाही अधिक प्रभावी माध्यम मिळावे, या दृष्टीने शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.