* बुलढाणा बाजार समितीच्या चांडोळ उपबाजारासाठी पाच एकर जागा मंजूर
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
शासकीय निधीचा कुठलाही आधार नसताना स्व.उत्पन्नाचे स्त्रोत वाढवून बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासामध्ये मोलाची कामगिरी बजावणाऱ्या सभापती जालिंदर बुधवत यांच्या आणखी एका सकारात्मक निर्णयाची अंमलबजावणी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीला चांडोळ उपबाजारासाठी पाच एकर जागा शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आली असून या ठिकाणी उपबाजार सुरू करण्यात येणार आहे. शेतकरी हितासाठी हे महत्त्वाचे पाऊल असून आता विदर्भ व मराठवाडा सीमेवर असलेल्या शेतकऱ्यांना आपला शेतीमाल योग्य भावात विकण्यासाठी हक्काची बाजारपेठ निर्माण होणार असल्याची प्रतिक्रिया सभापती जालिंदर बुधवत यांनी दिली आहे.
शेतीविषयक धोरण बदलत असताना कृषी उत्पन्न बाजार समित्यांना टिकाव धरण्यासाठी आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत वाढवणे गरजेचे आहे. त्या दृष्टिकोनातून बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीला चांडोळ येथे उपबाजार सुरू करण्यासाठी शासनाकडून पाच एकर जागा मंजूर झाली आहे.
चांडोळ येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार सुरू व्हावा यासाठी जालिंदर बुधवत यांनी गेल्या सहा ते सात वर्षांपासून मंत्रालय स्तरावर स्वतः पाठपुरावा करत सकारात्मक हालचाली सुरू केल्या होत्या. त्यासाठी जागेची मुख्य अडचण होती. वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून चांडोळ येथील गट नंबर ६५९ मधील ई वर्गाची दोन हेक्टर आर. अर्थात पाच एकर शासकीय जमीन उपबाजाराच्या प्रयोजनासाठी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या ( क्रमांक जमीन २०१७/ प्र.क्र . २५४ / जमीन - ९ ई - १४४५७५७) आदेशाने नाममात्र एक रुपया या दराने महाराष्ट्र शासनाने मंजूर केली आहे. तर जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी रा. प्र. क्र. एल.एन.डी.- १२ / चांडोळ/ ५९/ २०२५-२६ या आदेशाने कृषी उत्पन्न बाजार समितीला ही जागा हस्तांतरित केली आहे.
कधीकाळी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी देखील डबघाईस आलेल्या बुलढाणा बाजार समितीत सभापती जालींदर बुधवत यांच्या माध्यमातून गेल्या १० वर्षात झालेल्या प्रयत्नांमुळे मोठा बदल घडून आला आहे. ड वर्गातून अ वर्गात ही बाजार समिती आणली. अंतर्गत सुविधा, प्रशासकीय इमारती निर्माण, बुलढाणा, दुधा व धाड येथे उत्पादन ठेवण्यासाठी गोडाऊन व्यवस्था, गाळे बांधकामातून कायमस्वरूपी मिळालेला उत्पन्नाचा स्त्रोत, जिल्ह्यातील एकमेव बुलढाणा बाजार समितीला असलेला दुधा येथील पेट्रोल पंप बाजार समितीच्या विकासात भर घालत आहे.
चांडोळ या परिसरातील अनेक शेतकरी मराठवाडा भागात शेतमाल विक्रीसाठी नेतात. बाजार समितीने चांडोळ येथे उपबाजार सुरु केल्यास याचा फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होऊन आपुसकच उत्पन्न देखील वाढेल हा हेतु समोर ठेऊन जालीधर बुधवत यांनी सातत्याने प्रयत्न केले. यात जागा ही बाब मुख्य अड्सर होती. राज्य सरकार ने जागा मंजूर केल्याने हा अड्सर दूर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा ५० ते ६० किमी चा फेरा वाचणार आहे. जागा हस्तांतरणा बाबतचा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पारित केल्यानंतर सभापती जालिंदर बुधवत यांनी सर्व संचालकांच्या वतीने आज 30 जुलै रोजी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांची भेट घेऊन त्यांचे आभार देखील मानले.
शेतमाल विक्री करताना खासगी लुटिचे आणि फसवणूक प्रकार टाळण्यासाठी उपबाजार चांडोळ परिसरातील शेतकरी बांधवांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. संपूर्ण संचालक मंडळ व प्रशासकिय सदस्य यांचे पाठबळ आपल्याला लाभत असून लवकरच पुढील कार्यवाही पूर्ण करू अशी प्रतिक्रिया जालींदर बुधवत यांनी बोलताना दिली आहे.
