बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
येथील महावितरणचे कर्मचारी तथा प्रसिद्ध नाट्यकर्मी गणेश राणे यांना महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळाच्यावतीने दिला जाणारा सन २०२४ चा विश्वकर्मा गुणवंत पुरस्कार पुरस्कार जाहीर झाला आहे. रोख २५ हजार रुपये, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
राज्य शासनाच्या कामगार कल्याण मंडळाच्यावतीने साहित्य, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात कार्य करणाऱ्या कामगारांना विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त भास्कर मोरडे यांनी १६ जून रोजी राज्यातील ५१ कामगारांची सन २०२४ च्या विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारासाठी अंतिम निवड झाल्याचे परीपत्रक जाहीर केले आहे. यामध्ये बुलढाणा महावितरणच्या सागवन उपकेंद्राचे वरीष्ठ यंत्रचालक गणेश राणे यांचा समावेश आहे. राणे यांनी नाट्यक्षेत्रात अभिनेता म्हणून भरीव योगदान दिले असून त्यांना राज्यस्तरावर व प्रादेशिक स्तरावर अभिनयासाठी अनेक पारितोषिके प्राप्त झाली आहेत. यापूर्वी महावितरणतर्फेही त्यांना गुणवंत कामगार पुरस्काराने गौरविण्यात आले होते. अक्षरदेह नाट्यकला संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविले आहेत. सामाजिक व संघटनात्मक क्षेत्रात देखील त्यांचे कार्य उल्लेखनीय असल्याने त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. रोख २५ हजार रुपये, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून लवकरच मुंबई येथे भव्य शासकीय समारंभात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
या पुरस्काराचे श्रेय त्यांनी कुटुंबीय, अक्षरदेह नाट्यकला संस्था, महावितरण कंपनी, कामगार कल्याण मंडळ बुलढाणा केंद्र व समस्त नाट्यकर्मींना दिले आहे. पुरस्काराबद्दल विविध संस्था व मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
