शाळेसाठी राखीव खुल्या जागेच्या कथित बेकायदेशीर विक्रीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

शाळेसाठी राखीव खुल्या जागेच्या कथित बेकायदेशीर विक्रीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
मेहकर  : (एशिया मंच न्यूज )
         मेहकर शहरातील सर्वे क्रमांक 16/2 भाग-1 येथील शाळेसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या खुल्या जागेची कथित बेकायदेशीर विक्री करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते शेख हमीद शेख अफसर बागवान यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे 16 जून रोजी तक्रार दाखल केली आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून विक्री व्यवहार तात्काळ स्थगित करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
तक्रारीनुसार, संबंधित ले आऊटमध्ये सार्वजनिक व शैक्षणिक उपयोगासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागेवर प्लॉट तयार करून त्याची खाजगी विक्री करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. मूळ जमीन मालक डॉ. एजाज अहमद खान यांनी ही जागा प्रथम निसार अहमद अन्सारी यांना विक्री केल्याचे, त्यानंतर निसार अहमद अन्सारी यांनी शेख आमीर शेख इस्माईल यांना विक्री केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
सन 2006-07 मध्ये संबंधित जमिनीला गैरशेती (एनए) परवानगी देताना मंजूर करण्यात आलेल्या ले आऊट नुसार सार्वजनिक वापरासाठी खुली जागा राखीव ठेवण्यात आली होती. 
         महाराष्ट्र जमीन महसूल नियमांनुसार ले आऊटमध्ये किमान 15 टक्के क्षेत्र खुल्या जागेसाठी राखीव ठेवणे बंधनकारक असून, सदर लेआऊटमध्ये 3214.59 चौरस मीटर क्षेत्र सार्वजनिक वापरासाठी राखीव असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सध्या या परिसरात सुमारे 70 कुटुंबे वास्तव्यास असून, ही खुली जागा लहान मुलांच्या खेळासाठी तसेच सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी वापरली जात असल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे या जागेचे खाजगीकरण झाल्यास नागरिकांच्या सार्वजनिक हक्कांवर गदा येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
         तक्रारदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे संबंधित विक्री व्यवहाराची चौकशी करणे, जागेवरील खरेदी-विक्री व्यवहार तात्पुरते स्थगित करणे, मंजूर ले आऊट नुसार प्रत्यक्ष पाहणी करून जागा सार्वजनिक वापरासाठी संरक्षित घोषित करणे तसेच नियमभंग आढळल्यास संबंधित विक्रेते व खरेदीदारांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या तक्रारीच्या प्रती नगर विकास मंत्री, महसूल मंत्री, मुख्यमंत्री, उपविभागीय अधिकारी (मेहकर), तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. सदर प्रकरणामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.