बुलढाणा विभागातील १० कर्मचाऱ्यांना लालपरी गौरव रत्न पुरस्कार !
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
राज्य परिवरहन महामंडळाच्या वतीने यावर्षीपासून प्रथमच सुरू करण्यात आलेल्या राज्यस्तरीय 'लालपरी गौरव रत्न' पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून ९८ कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये बुलढाणा विभागातील १० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्ताने कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात तब्बल एक लाखाच्यावर अधिकारी, कर्मचारी काम करतात.
त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक व्हावे या उद्देशाने एसटी महामंडळामध्ये नवनवीन उपक्रम राबवले जातात. या उपक्रमांमधून सर्वोत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी व कामगार यांना महामंडळाच्या वर्धापन दिनी गौरवण्यात येते. असाच एक नवीन उपक्रम एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आला. यावर्षीपासून 'लाल परी गौरव रत्न पुरस्कार' देण्याचे जाहीर करण्यात आले. ज्या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे, महामंडळाच्या हिताचे काम केले त्यांना गौरवण्यात आले. एसटीच्या अपेक्षित उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न आणणारे चालक, वाहक तसेच प्रवासादरम्यान सापडलेल्या वस्तू, दागिने,पैसे, महत्त्वाची कागदपत्रे प्रवाशांना परत करणारे कर्मचारी यांचा गौरव करण्यात आला आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाची प्रतिमा उंचवण्याची, वाढवण्याची जनमानसात कामे केली अशा कर्मचाऱ्यांना 'लाल परी गौरव रत्न पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यानुसार मागवलेले शिफारस अर्ज प्रथम विभागातून त्यानंतर प्रादेशिक स्तरावरून निवडून व अंतिम निवड मुंबई येथुन जाहीर झाली. संपूर्ण महाराष्ट्रातून लिपिक प्रवर्गातून एकमेव सचिन लक्ष्मण पिंगळे लिपिक, विभागीय कार्यालय, रा.प. बुलढाणा यांची निवड झालेली आहे. त्यामुळे ते महाराष्ट्रातील लिपिक प्रवर्गातील "लाल परी गौरव रत्न पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले आहे. त्यांच्यासह संजय श्रीराम लांडे वाहतूक नियंत्रक, चिखली, गणेश देवरे, चालक, मेहकर, राजू प्रल्हाद चव्हाण, वाहक, मेहकर , सुधीर अशोक शिंगोटे, चालक, वाहक मलकापूर, सुनील बोर्डे चालक, वाहक मलकापूर, ए.एम.अहमद चालक, वाहक जळगाव जामोद, आयुब खान चालक, वाहक,जळगाव जामोद यांचा गौरव करण्यात आला.
* वैशाली क्षीरसागर पहिल्या महिला वाहक :
बुलढाणा विभागातील बुलढाणा आगाराच्या वैशाली क्षीरसागर या पहिल्या महिला कर्मचारी वाहक 'लाल परी गौरव रत्न' पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. या सर्व पुरस्कारार्थींचा प्रादेशिक कार्यालय, अमरावती येथे प्रादेशिक व्यवस्थापक रोहन पलंगे, कार्यशाळा अभियंता राहुल मोडक यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. विभागीय वाहतूक अधिकारी संदीप रायलवार, विभागीय सांख्यिकी अधिकारी नितीन देशमुख , उप.अभियंता विजय वाकोडे, विभागीय अभियंता विनोद गायकवाड यांच्यासह प्रादेशिक, विभागीय कार्यालय येथील अधिकारी व कर्मचारी अमरावती प्रदेश यांची उपस्थिती होती.
