शिवसाई युनिव्हर्सल ज्ञानपीठच्या विद्यार्थ्याची राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी


शिवसाई युनिव्हर्सल ज्ञानपीठच्या विद्यार्थ्याची राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
         जळगाव येथे 10 ते 15 जून 2026 दरम्यान आयोजित महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन यांच्या द्वारा आयोजित राज्यस्तरीय कब क्लास बॉक्सिंग स्पर्धेत शिवसाई युनिव्हर्सल ज्ञानपीठ स्कूलचा इयत्ता पाचवीतील विद्यार्थी मोहम्मद अरमान याने अंडर-11 मुले, 36-38 किलो वजनी गटात उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक (Silver Medal) पटकावले.

          स्पर्धेतील पहिल्या सामन्यात मोहम्मद अरमान याने परभणीच्या खेळाडूवर मात केली. दुसऱ्या सामन्यात छत्रपती संभाजीनगरच्या खेळाडूचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. अंतिम सामन्यात नागपूरच्या खेळाडूविरुद्ध अत्यंत चुरशीची लढत देत त्याने आपल्या कौशल्याची छाप पाडली. सामना 3-2 अशा अत्यंत निकटच्या गुणफरकाने संपला आणि त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

         मोहम्मद अरमान हा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्याद्वारा सुरू असलेल्या जिल्हा बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतो. याला राष्ट्रीय प्रशिक्षक मोहम्मद सुफियान यांचे मार्गदर्शन लाभत असून त्यांच्या प्रशिक्षणाखाली त्याने हे यश संपादन केले आहे. अरमानची मेहनत, शिस्त, जिद्द आणि प्रशिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळे त्याने राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी नोंदवली.

         या यशामुळे विद्यालयाचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल केले असून मोहम्मद अरमानच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल शिवसाईचे परिवाराचे सर्वेसर्वा श्री. दत्तात्रय लहाने व शिवसाई युनिव्हर्सल ज्ञानपीठ चे प्राचार्य प्रमोद मोहरकर, शिक्षकवृंद तसेच शिवसाई परिवाराने मोहम्मद अरमान आणि त्यांचे प्रशिक्षक मोहम्मद सुफियान यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.