* नेत्रतज्ज्ञ म्हणतात पालकांनो वेळीच लक्ष्य द्या
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
रस्त्यावर फेकलेल्या चुन्याच्या पुड्या मुळे लहान मुलांच्या डोळ्यांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. खेळ म्हणून पुडी फोडताना फटाक्यासारखा फट्ट आवाज करणारी पुडी कायमच्या अपंगात्वाला कारणीभूत ठरू लागली आहे. डोळ्यात चुना जाऊन अनेक लहान मुले सध्या दवाखान्यात भरती होत आहे. ही बाब गंभीर व सार्वत्रिकरित्या आढळत असल्याने पालकांनी याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन नेत्रतज्ञ डॉ.शोन चिंचोले यांनी केले आहे.
किराणा दुकानांमध्ये काही विशिष्ट तंबाखू उत्पादनांसोबत छोट्या हवाबंद चुन्याच्या पुड्या दिल्या जातात. अनेक वेळा तंबाखू घेणारे ग्राहक या चुन्याच्या पुड्या वापरत नाही. परिणामी दुकानदारांकडे या पुड्यांचा साठा उरतो आणि काही ठिकाणी त्या रस्त्यावर किंवा दुकानाबाहेर फेकून दिल्या जातात.
हाच निष्काळजीपणा लहान मुलांच्या डोळ्यांसाठी मोठा धोका ठरत आहे.
लहान मुलांनी खेळ म्हणून फोडलेली पुडी फुटली की चुना डोळ्यात जाऊन कायम स्वरुपी दृष्टीदोष, अंधत्व व अनेक समस्यां उद्भवत आहे. सध्या ही समस्या सार्वत्रिक दिसत असून नेत्रतज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे. हवाबंद पुड्यांमध्ये दाब (प्रेशर) असल्यामुळे लहान मुले त्या चप्पलने दाबून, दगडाने ठेचून किंवा फटाक्यासारख्या आवाजासाठी फोडतात. पुडी फुटताच त्यातील चुना हवेत उडून थेट डोळ्यांमध्ये जातो. चेहऱ्याजवळ असल्यामुळे सर्वाधिक परिणाम डोळ्यांवर होतो.
चुना डोळ्यात गेल्यानंतर तीव्र जळजळ, लालसरपणा, पाणी येणे, डोळा न उघडता येणे, असह्य वेदना अशा तक्रारी त्वरित सुरू होतात.
* बुबळावर इजा व परिणाम :
लहान मुले घाबरून डोळे चोळतात, त्यामुळे इजा आणखी वाढते. चुना डोळ्याच्या आतील भागात जाऊन कंजंक्टिव्हा व बुबुळावर (कॉर्निया) गंभीर घर्षण निर्माण करतो. रासायनिक प्रतिक्रिया होऊन कॉर्नियावर जखम, पांढरे डाग किंवा अल्सर तयार होऊ शकतात. काही प्रकरणांमध्ये ही इजा कायमस्वरूपी राहून दृष्टी कमी होण्याचा किंवा अंधत्वाचा धोका उद्भवत आहे.
* दर दोन दिवसांनी एक रुग्ण :
दर दोन-तीन दिवसांनी अशा प्रकारच्या दुर्घटनांमध्ये जखमी झालेली लहान मुले दवाखान्यात येत असल्याचे नेत्रतज्ञ डॉक्टर शोन चिंचोले म्हणाले. काही वेळा इजा सौम्य असते, तर काही वेळा ती अत्यंत गंभीर स्वरूपाची असते. म्हणून सर्व दुकानदार, व्यावसायिक आणि नागरिकांनी मुलांना सूचना देऊन जागरूक करावे. उरलेल्या चुन्याच्या पुड्या रस्त्यावर किंवा उघड्या जागेत फेकू नयेत. त्या सुरक्षितरीत्या नष्ट कराव्यात. तसेच पालकांनी मुलांना अशा पुड्यांपासून दूर ठेवावे असे आवाहन डॉक्टर शोन चिंचोले यांनी केले आहे.
