* महापुरुषांच्या ऐतिहासिक कार्यास उजाळा मिळाला - आ.खरात
मेहकर : (एशिया मंच न्यूज )
विधवा व एकल महिलांचा सामूहिक पुनर्विवाह सोहळा मेहकर येथे पार पडला. मेहकरवाशी यांनी या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.गावातून जल्लोषात निघालेली वधूवरांची भव्य वरात,वरबापाच्या भूमिकेतील प्रा.लहाने, शैलाश सावजी, महेश रिंढे, शेकडो वऱ्हाडी व सहभागी मानस फाउंडेशन चे कार्यकर्ते यामुळे मेहकर नगरी गजबजून गेली. महापुरुषांनी पाहिलेले स्वप्न आज प्रत्यक्षात उतरले आहे. महापुरुषांच्या ऐतिहासिक कार्यास लहाने सरांमुळे उजाळा मिळाल्याचे आ.सिद्धार्थ खरात यावेळी म्हणाले.
'मानस फाउंडेशन, सपना सुबोध सावजी चॅरिटेबल ट्रस्ट (मुंबई) आणि कृषीवैभव लॉन' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात १० परित्यक्ता, विधवा व घटस्फोटीत महिलांनी नव्या आयुष्याची सुंदर सुरुवात झाली. रविवारी १७ मे २०२६ रोजी येथील हॉटेल केव्ही प्राईड (कृषीवैभव लॉन) येथे दुपारी ११ वाजता हा सोहळा पार पडला. तत्पूर्वी, संपूर्ण मेहकर शहरातून भल्या मोठ्या वाहनांमधून या १० जोडप्यांची भव्य वरात काढण्यात आली, जी शहरात कौतुकाचा आणि परिवर्तनाचा मुख्य केंद्रबिंदू ठरली. त्यानंतर पुरोगामी अशा 'सत्यशोधक' पद्धतीने विधवा बहिणींचा विवाह सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच विवाह इच्छुक तरुण-तरुणींचा परिचय मेळावाही घेण्यात आला. या विवाह सोहळ्याचे संकल्पक प्रा.डी.एस. लहाने यांनी आयोजन मागची भूमिका मांडली.
* हिमालयाच्या उंचीचे सामाजिक कार्य: श्यामबाबू उमाळकर
कार्यक्रमाप्रसंगी बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्यामभाऊ उमाळकर म्हणाले, प्रा. लहाने सरांचे कार्य हिमालयाच्या उंचीचे असून, राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाज परिवर्तनाचा हा सर्वोच्च केंद्रबिंदू आहे. या कार्याने समाजात आमूलाग्र आणि सकारात्मक बदल निश्चितपणे दिसून येईल. भविष्यात मेहकर वासीयांच्या वतीने फाउंडेशनला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. या ऐतिहासिक प्रसंगाचे औचित्य साधून समाजात सकारात्मक क्रांती घडवून आणणारे 'मानस फाउंडेशन'चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डी. एस. लहाने यांचा पत्रकार कैलास राऊत आणि मित्र परिवाराने सन्मान चिन्ह देऊन गौरव केला.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शैलेश सावजी,माजी सभापती सौ. सायली सावजी, या दांपत्याने घरचेच कार्य असल्यासारखे संपूर्ण यंत्रणेसह मनापासून परिश्रम घेतले. त्यांच्या या आपुलकीमुळे सोहळ्याला भव्य आणि कौटुंबिक स्वरूप प्राप्त झाले. आमदार सिद्धार्थ खरात, नगराध्यक्ष किशोर गारोले, नगरसेवक महेश रिंढे,
ठाणेदार व्यंकटेश आलेवार, समाजसेविका शाहीना पठाण, स्वाती सावजी ,प्रतिभा भुतेकर, मनीषा वारे, गजानन मुळे, अँड संदीप जाधव,जोशी, फुलेकर, डोणगावचे सरपंच चरण आखाडे, उत्कर्ष अर्बनचे पदाधिकारी आणि मानस फाउंडेशनचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन महत्रे यांनी तर महेश रिंढे यांनी आभार मानले.
