दे. राजा : (एशिया मंच न्यूज )
धरण उशाशी, कोरड घशाशी या म्हणीप्रमाणे देऊळगाव राजा शहरातील जनतेचे होत आहे, नगरपरिषदच्या पाणीपुरवठा अभियंत्यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे शहरातील जनतेला 15 ते 17 दिवसानंतर पिण्याचे पाणी मिळत आहे. शहरवाशी यांचा पाणीपुरवठ्यासाठी नगरपरिषदवर आज 19 मे रोजी हंडा मोर्चा धडकला.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडक पूर्णा धरणामध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध असताना व शहरातील जलकुंभा मध्ये साठवण क्षमता अधिकची असताना पाणीपुरवठ्याचे नियोजन व्यवस्थित नसल्याने सर्वपक्षीय नागरिकांनी नगरपरिषदेवर हंडा मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला. यावेळी मोर्चेकरांना पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा करण्यात येईल व तांत्रिक अडचणी आहेत त्या दूर करण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले. मोर्चेकरांनी नगर परिषद मधील अध्यक्ष यांच्या कक्षामध्ये रिकामे पाण्याचे माठ फोडण्यात आले.
नगरपरिषद ने शहरातील जनतेला मुबलक व शुद्ध पाणी वेळेवर मिळण्यासाठी शासन स्तरावर अंतर्गत पाईपलाईन , ठीक ठिकाणी जल कुंभ व जल शुद्धीकरण केंद्र निर्माण करण्यासाठी प्रस्ताव देऊन मान्यता घेतली. विविध कामे अंतिम टप्प्यात असुन सुद्धा केवळ पाणीपुरवठा अभियंता यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे शहरातील जनता तहानलेली आहे. सदर अभियंता यांनी ज्या-ज्या तांत्रिक बाबी निर्माण होत आहे, त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे ही त्यांची जबाबदारी असताना सदर अभियंता हे त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यासाठी शहरातील नागरिकांनी हंडा मोर्चा न. प. वर नेऊन आपला रोश व्यक्त करत वेळेवर मुबलक व स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचे निवेदन दिले. काही काळ न.प. मध्ये तनावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी उपस्थिताना नगराध्यक्ष माधुरी शिपणे व मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी सांगितले की, येत्या पंधरा दिवसात पाणीपुरवठा वितरणा मध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करून शहर वासियांना वेळेवर मुबलक पाणीपुरवठा करण्यात येईल.
