शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी काँग्रेसचा 'आसूड मोर्चा' * सहभागी होण्याचे राहुल बोंद्रे, प्रकाश पाटील अवचार यांचे आवाहन


शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी काँग्रेसचा 'आसूड मोर्चा' 
* सहभागी होण्याचे राहुल बोंद्रे, प्रकाश पाटील अवचार यांचे आवाहन
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
          शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे केंद्र व राज्य सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत काँग्रेसने सोमवारी १ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर 'आसूड मोर्चा' आयोजित केला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार असून सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसकडून जो रदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.

             दुपारी १२ वाजता गर्दै हॉल येथून मोर्चाला प्रारंभ होणार असून कारंजा चौक, जनता चौक आणि जयस्तंभ चौक मार्गे तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. मोर्चानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आली. शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या नावाखाली अटी शर्तीच्या जाचात अडकविण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. पीककर्जासाठी लादण्यात आलेल्या अटींमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून इंधन आणि घरगुती गॅसच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांचे जीवनही महाग झाले आहे. नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार, स्मार्ट मीटरची सक्ती आणि हमीभाव खरेदीतील अडचणी यांसारख्या मुद्यांवर सरकारला जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले.

        जिल्हा काँग्रेस कमिटीचे मावळते अध्यक्ष राहुल बोंद्रे, नवनियुक्त अध्यक्ष प्रकाश  पाटील अवचार यांनी जिल्ह्यातील शेतकरी, विद्यार्थी, शुवक, महिला तसेच काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मोर्चाद्वारे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, पीककर्जावरील जाचक अटी रद्द करणे, शेतमालाला हमीभावाचा कायदा लागू करणे, सोयाबीन, हरभरा, कापूस व तुरीला वाढीव हमीभाव देणे, पेट्रोल-डिझेल व सीएनजीचे दर कमी करणे, गॅस सिलिंडरचा तुटवडा दूर करणे, स्मार्ट मीटरची सक्ती थांबविणे, हमीभाव खरेदी केंद्रे सुरू ठेवणे, स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेची थकबाकी वितरित करणे, कृषी साहित्य जीएसटीमुक्त करणे तसेच कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना देऊन रोजगारनिर्मिती करणे आदी प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर काँग्रेसने छेडलेल्या या आंदोलनाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून मोर्चात होणाऱ्या सहभागाकडेही उत्सुकता आहे.
----------------------
Advt.....