संघटन सृजनने जिल्हा काँग्रेसला सृजनात्मक काय दिले ?* जेष्ठांना मार्गदर्शक ठेवून युवा चेहऱ्याला द्यायची होती संधी

संघटन सृजनने जिल्हा काँग्रेसला सृजनात्मक काय दिले ?
* जेष्ठांना मार्गदर्शक ठेवून युवा चेहऱ्याला द्यायची होती संधी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        काँग्रेस पक्षाने संघटन सृजन अभियनाअंतर्गत जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया राबवली खरी.. मात्र, या प्रक्रियेतून पक्षाला खरोखरच सृजनात्मक काय मिळाले? असा सवाल आता कार्यकर्ते आणि जनसामान्यांतून उपस्थित केला जात आहे. नव्या नेतृत्वाला संधी नाकारल्याने पक्षीय संघटन अधिक मजबूत कसे होणार? अशी चर्चा जिल्हाभर रंगली आहे.

        राजकारणात आज युवकांचा सहभाग वाढत असताना काँग्रेसने मात्र पुन्हा पारंपरिक नेतृत्वावरच विश्वास दाखवल्याची भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे. ज्येष्ठ नेत्यांचे अनुभव आणि मार्गदर्शन नक्कीच महत्त्वाचे असले तरी संघटनेची धुरा नव्या दमाच्या युवा नेतृत्वाकडे दिली असती, तर पक्षाला अधिक ऊर्जा आणि न्याय मिळाला असता. दुसरीकडे, भाजप आपली विचारधारा कायम ठेवत नव्या नेतृत्वाला संधी देऊन पक्ष विस्ताराचा प्रयत्न करत असल्याचे उदाहरण अनेकदा समोर आले आहे. मग काँग्रेसनेही संघटन वाढीसाठी तशाच धाडसी निर्णयांची गरज ओळखायला हवी होती. नवनियुक्त अध्यक्ष प्रकाश पाटील हे ज्येष्ठ नेते असले तरी त्यांच्या वयाचा विचार करता ते जिल्ह्यातील १२०० पेक्षा अधिक गावांमध्ये पक्षाची मोट कसे बांधतील ? हे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. दुसरीकडे काँग्रेस प्रवेशावेळी संदीप शेळके यांना जिल्हाध्यक्ष पदाचा शब्द देण्यात आला होता. बुलढाणा वन मिशनच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढल्यामुळे त्यांच्याकडे तगडा अनुभव देखील होता. मात्र काँग्रेसने वेळेवर ज्येष्ठ नेत्याला संधी देवून पक्षाची मोठ्या प्रमाणात हानी करुन घेतल्याच्या चर्चांना समाजमाध्यमांमध्ये उधाण आले आहे. दरम्यान, काँग्रेसचे युवा नेते संदीप शेळके यांनी मात्र कोणताही उघड त्रागा न करता संयमी भूमिका घेतली आहे. त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ते राहुल गांधी अर्थात “रागा” यांच्या विचारांसोबत ठाम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पक्षनिष्ठा जपत त्यांनी अप्रत्यक्षपणे कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश दिल्याची चर्चा आहे.

*“शो मस्ट गो ऑन”; संदीप शेळके यांची संयमी राजकीय भूमिका चर्चेत : 
           बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी झालेल्या संघटन सृजन प्रक्रियेनंतर जिल्ह्यातील राजकारणात विविध चर्चांना उधाण आले असताना काँग्रेसचे युवा नेते संदीप शेळके यांनी अत्यंत संयमी आणि सकारात्मक भूमिका मांडत पक्षनिष्ठेचा संदेश दिला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून संदीप शेळके यांनी म्हटले आहे की, आयुष्यात आणि राजकारणात अनेकदा अडचणीचे प्रसंग येतात, मात्र प्रत्येक प्रसंगाला ताकदीने आणि धैर्याने सामोरे गेले पाहिजे. जिल्हाध्यक्ष पदासाठी आपल्या नावाची शिफारस करून प्रेम आणि ताकद दिल्याबद्दल त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांचे अभिनंदन करत संदीप शेळके म्हणाले की, काँग्रेस हा माझ्यासाठी नवा विचार नाही, माझे मूळच काँग्रेसचे आहे. पद मिळो अथवा न मिळो, काँग्रेस पक्षाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवणे आणि जनतेचे प्रश्न सोडवणे हेच आमचे ध्येय राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.