गव्हाचे काड जाळण्याऐवजी शेतातच कुजवून मातीत मिसळू द्या...* शेती, माती आणि नाती जपणाऱ्या अभिता ॲग्रो कंपनीचे आवाहन

गव्हाचे काड जाळण्याऐवजी शेतातच कुजवून मातीत मिसळू द्या...
* शेती, माती आणि नाती जपणाऱ्या अभिता ॲग्रो कंपनीचे आवाहन
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
          शेतकऱ्यांनी गव्हाचे काड (गव्हाचा पेंडा) जाळण्याऐवजी शेतातच कुजवून मातीत मिसळू द्यावे. जमिनीच्या आरोग्यासाठी हे अत्यंत फायदेशीर ठरते. जमिनीचा पोत सुधारुन उत्पादनात वाढ होते. शेतकऱ्यांनी गव्हाचे काड जाळू नये, असे आवाहन शेती, माती आणि नाती जपणाऱ्या कृषी क्षेत्रातील अग्रगण्य अभिता ॲग्रो इंडस्ट्रीजच्यावतीने करण्यात आले आहे.

        गव्हाचे काड शेतीसाठी खूप फायदेशीर आहे. काड मातीत मिसळल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा कणा आहे. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि ती अधिक सुपीक होते. जेव्हा काड मातीत कुजते, तेव्हा जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. यामुळे पिकांना पाणी देण्याच्या दोन पाळ्यांमधील अंतर वाढवता येते. पावसाच्या पाण्याचाही जमिनीत चांगला निचरा होतो. शेतातील गव्हाचे काड (पेंढा) जाळणे अत्यंत हानिकारक आहे. यामुळे जमिनीतील उपयुक्त जिवाणू मरतात. सेंद्रिय कर्ब नष्ट होतो आणि जमिनीचा पोत बिघडून ती ओसाड बनते. काड न जाळता रोटावेटरने बारीक करून जमिनीत कुजवावे किंवा त्यावर डिकंपोजर वापरून नैसर्गिक खत बनवावे. यामुळे जमिनीची सुपीकता व पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, अशी उपयुक्त माहिती देण्यात आली आहे.