शेतकऱ्यांचा रखडलेला पिकविमा तात्काळ द्या.. * शेतकऱ्यांना कॅन मध्ये डिझेल उपलब्ध करून द्या - तुपकरांची आक्रमक भूमिका..!

शेतकऱ्यांचा रखडलेला पिकविमा तात्काळ द्या..
 * शेतकऱ्यांना कॅन मध्ये डिझेल उपलब्ध करून द्या - तुपकरांची आक्रमक भूमिका..!
* रविकांत तुपकरांनी मंत्रालयात घेतली कृषिमंत्री व पालकमंत्र्यांची भेट
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
         बुलढाणा जिल्ह्यातील हजारो नुकसानग्रस्त शेतकरी अद्यापही पिकविमा पासून वंचित आहेत. पेरणी तोंडावर आल्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने पिकविम्याची रक्कम अदा करावी, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्याचे कृषिमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे. शिवाय जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांची देखील भेट घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कॅन मध्ये मुबलक प्रमाणात डिझेल देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी आ.मनोज कायंदे हे देखील उपस्थित होते. आज तुपकरांनी मुंबई येथे मंत्रालयात दोन्ही मंत्री महोदयांची भेट घेऊन पिकविमा आणि डीझेल या शेतकऱ्यांच्या सध्याच्या प्रमुख समस्याबाबत चर्चा केली. अन्यथा आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा देखील तुपकरांनी दिला आहे.
          क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी यापूर्वीच पिकविमा आणि इंधन तुटवडा याबाबत शासन आणि प्रशासनाला निवेदन दिले होते. मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यासोबतच जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन या विषयावर त्यांनी चर्चा केली होती. पिकविमा आणि शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी डिझेल न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा गंभीर इशारा देखील त्यांन दिला होता. दरम्यान या संदर्भात रविकांत तुपकर यांनी आज मुंबई येथे मंत्रालयात जाऊन कृषी मंत्री ना.भरणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. बुलडाणा जिल्ह्यातील हजारो शेतकरी पिकविमा पासून वंचित आहेत. २०२४ मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप पिक विम्याची हक्काची रक्कम मिळाली नाही. तर २०२५ मध्ये झालेल्या नुकसानीची रक्कम देखील शेतकऱ्यांना मिळालेली नाही, जिल्हाभरातील हजारो शेतकरी हक्काच्या पिकविम्या च्या रकमेकडे  आस लावून आहेत. नैसर्गिक आपत्ती, शेती उत्पादनांना कवडीमोल भाव आणि त्यातच आता इंधन टंचाई यामुळे शेतकरी ऐन पेरणीच्या तोंडावर अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिक विमा मिळणे अत्यंत गरजेचे आहे, याबाबत तातडीने चौकशी करून संबंधित कंपन्यांना शेतकऱ्यांना पिक विमा अदा करण्याचे कडक आदेश द्यावेत, अशी आग्रही मागणी रविकांत तुपकर यांनी कृषी मंत्री ना. भरणे यांच्याकडे केली. ना. भरणे यांनी यावेळी तुपकर यांची सर्व बाजू व्यवस्थित समजावून घेत यांना सकारात्मक आश्वासन दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पिक विमाचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर इंधन तुटवड्याबाबत तुपकरांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद आबा पाटील यांची आ. मनोज कायंदे यांच्या उपस्थितीत भेट घेतली. सध्या राज्यात आणि जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुख्यत्वे डिझेलचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने शेतीकामासाठी तातडीने डिझेलची व्यवस्था करावी तसेच ट्रॅक्टर मालक व शेतकऱ्यांना कॅन मध्ये डिझेल देण्याची देखील सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली. 
          पालकमंत्री ना. पाटील यांच्याशी चर्चा करताना रविकांत तुपकर यांनी सांगितले की, शेतीच्या हंगामी कामांसाठी ट्रॅक्टर, पंप, अवजारे व इतर यंत्रसामग्रीसाठी डिझेल अत्यंत आवश्यक असते, परंतु सध्या पेट्रोल पंपांवर डिझेलचा साठा उपलब्ध नाही व काही पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध झाल्यास ट्रॅक्टरमध्ये मर्यादित प्रमाणात डिझेल दिले जात आहे तसेच कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची नांगरणी, पेरणी, फवारणी, मशागत तसेच इतर शेतीची महत्त्वाची कामे वेळेवर होत नसून आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. आधीच नैसर्गिक संकटे आणि वाढते उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत आहे. अशा परिस्थितीत डिझेल टंचाईमुळे शेतकऱ्यांच्या समस्या अधिक गंभीर होत आहेत. शेतकऱ्यांची शेती मशागतीची कामे वेळेत पूर्ण न झाल्यास यावर्षीचा हंगामावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, पेरण्या देखील खोळंबू शकतात त्यामुळे सरकारने या समस्येकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. शेती कामासाठी ट्रॅक्टर मालक व शेतकऱ्यांना आवश्यक तेवढे डिझेल उपलब्ध करून द्यावे, आणि त्यांना कॅन मध्ये डिझेल देण्याची सुविधा द्यावी तशा सूचना पेट्रोल पम्प मालक आणि प्रशासनास द्यावी, अशी मागणी देखील रविकांत तुपकर यांनी यावेळी केली. प्रशासनाला निवेदन देऊन आणि आंदोलनाचा इशारा देऊन न थांबता तुपकर यांनी स्वतः दोन्ही मंत्री महोदयांची भेट घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तळमळीने समस्या मांडल्या त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.