* मिशन परिवर्तन अंतर्गत दहा दिवसीय प्रात्यक्षिक शिबिराला प्रारंभ
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
महिला व मुलींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना पाहता त्यांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी पोलीस विभाग, महिला व बालकल्याण विभाग आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. शहरातील म्हाडा कॉलनीत गुरुवारपासून दहा दिवसीय प्रात्यक्षिक शिबिराला प्रारंभ करण्यात आला आहे. या शिबिरात लाठीकाठी, दांडपट्टा, कराटे यासह मैदानी खेळाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
जिल्हा पोलीस दल, महिला व बालकल्याण विभाग, विश्वसिंधू बहुउद्देशीय सामाजिक संस्था, स्वामीराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येथील म्हाडा कॉलनी परिसरात पोलीस विभागाच्या 'मिशन परिवर्तन' अंतर्गत हे प्रात्यक्षिक शिबीर होत आहे. पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराला सुरुवात करण्यात आली आहे. महिला व मुलींसाठी दहा दिवसांचे प्रात्यक्षिक शिबिर घेण्यात येत आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सुनील अंबुलकर यांच्या हस्ते १६ एप्रिल रोजी या शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी तालुका महिला व बाल संरक्षण अधिकारी राम वसु, विश्वसिंधु बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संदीप वानखेडे, पत्रकार दीपक मोरे, संदीप शुक्ला, निलेश राऊत यांची उपस्थिती होती. संचलन गायत्री सावजी यांनी केले तर आभार आरती मख यांनी मानले.
* ७० महिला व मुलींचा सहभाग :
प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ७० पेक्षा अधिक महिला व मुलींनी सहभाग घेतला आहे. तज्ञ मार्गदर्शकांकडून त्यांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात येत आहे. म्हाडा कॉलनीतील निसर्गरम्य परिसरात होत असलेल्या शिबिरात सहभागी झाल्यानंतर आत्मविश्वास वाढल्याच्या भावना महिलांनी व्यक्त केल्या.
* सामाजिक संस्थांचा पुढाकार :
महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ झाल्याची बाब चिंताजनक तितकीच चीड आणणारी आहे. नोकरी, व्यवसाय, शिक्षण, प्रवास यासह इतर कारणांमुळे महिलांना घराबाहेर पडावे लागते. समाजकंटक याचा फायदा घेऊन त्यांच्यावर अत्याचार करतात. महिलांना स्वतःचे संरक्षण स्वतःच करता आले पाहिजे, याकरिता बुलढाण्यातील सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. विश्वसिंधु बहुद्देशीय सामाजिक संस्था, स्वामीराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थानी पोलीस आणि महिला व बालकल्याण विभागाच्या मदतीने प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे. गुरुवारपासून हे शिबीर सुरू झाले असून महिला व मुलींना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
