प्रशासन अलर्ट मोडवर ; आठ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित* जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांची कारवाई

प्रशासन अलर्ट मोडवर ; आठ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित
* जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांची कारवाई
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
         खरीप हंगामपूर्वी प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांचे आठ खते परवाने निलंबित करण्यात आले तर दोन कृषी केंद्रांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी ही कारवाई केली असून खत विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

        जिल्ह्यातील गुणनियंत्रण निरीक्षक यांनी केलेल्या तपासणी दरम्यान अनियमितता आढळली. त्यामुळे जिल्ह्यातील आठ रासायनिक खत विक्री परवाने निलंबीत केले आहेत. खरीप हंगामात शेतकऱ्यांना खताची कमतरता भासू नये यासाठी प्रशासनाच्यावतीने नियोजन करण्यात आले आहे. कृत्रिम खतटंचाई निर्माण करणाऱ्यांवर तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाईचा इशारा दिला होता. त्याअनुषंगाने खरीप हंगामाच्या पार्श्वभुमीवर कृषी सेवा केंद्राची कृषी विभागाच्या पथकांकडून तपासणी केली जात आहे. तपासणी दरम्यान त्रुटी आढळलेल्या कृषी सेवा केंद्र चालकांचे खत परवाने निलंबित करण्यात आले आहे.

      कृषि केंद्र धारकांनी अनुदानीत रासायनिक खते विक्री करतांना खरेदीदार शेतक-यांचे ई-पॉस मशीनवर नोंद घेऊन विक्री करणे व त्या शेतक-यांना पक्के बिल देणे अपेक्षित असतांना संबंधीत परवानाधारकांनी वरील नियमांचे पालन केले नाही. तसेच साठा पुस्तक अद्यावत न ठेवणे, देयकावर शेतक-यांची स्वाक्षरी नसणे व इतर कारणामुळे खत नियंत्रण आदेश १९८५ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील परवानाधारक खते विक्रेत्यांनी नियमानुसार रासायनिक खत विक्री करावी, अन्यथा कारवाईस सामोरे जावे, अशा सक्त सुचना संतोष डाबरे यांनी दिल्या आहेत.