दोनच राजे इथे जन्मले कोकण पुण्य भूमीवर...* आनंद शिंदेंनी बुद्ध-भीम गीतांमधून भरली स्फूर्ती : टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त दाद

दोनच राजे इथे जन्मले कोकण पुण्य भूमीवर...
* आनंद शिंदेंनी बुद्ध-भीम गीतांमधून भरली स्फूर्ती : टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त दाद 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        दोनच राजे इथे जन्मले, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं, भीमाची पुण्याई अरं माझ्या भीमाची पुण्याई, अशी एका पेक्षा एक तरुणाई मध्ये स्फूर्ती भरणारी गाणी गाऊन सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी बुलडानेकरांना तब्बल तीन तास खिळून ठेवले. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित गीते सादर करून शिंदे यांनी उपस्थितांमध्ये एक प्रचंड स्फूरण भरले. सादर होणाऱ्या प्रत्येक गीताला टाळ्यांचा गजरात बुलडाणेकरांनी चांगलीच दाद दिली. 
राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने ११ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता जिजामाता प्रेक्षागारावर प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा बुद्ध-भीम गीतांचा कार्यक्रम पार पडला. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी गारडगाव बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष अमोल हिरोळे होते. तसेच नगराध्यक्ष पूजाताई गायकवाड यांची विशेष उपस्थिती होती.
जो बाळा जो जो रे जो... हे पाळणा गीत गावून आनंद शिंदे यांनी आपल्या गायनाला सुरुवात केली. मेरा भीम वो नगीना है, कुणी नाही केलं, माझ्या भीमानं केलं, दिल्लीचं दालन खुलं व माय... भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव, लाल दिव्याच्या गाडीला, अशी विविध गीते सादर करून उपस्थित अनुयायांची मने आनंद शिंदे यांनी जिंकली. कार्यक्रमादरम्यान सामाजिक ऐक्य, समता आणि बंधुभावाचा संदेश देणारे वातावरण निर्माण झाले. आमदार गायकवाड यांनीही या प्रसंगी महामानवांच्या विचारांना अभिवादन करत, समाजाने त्यांचे विचार अंगीकारून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन केले.
 
* आमदार संजय गायकवाड यांनी धरला ठेका : 
         आमदार संजय गायकवाड यांनी या कार्यक्रमाला पूर्णवेळ हजेरी लावली. सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या बुद्ध-भीम गीतांच्या कार्यक्रमांत आनंद शिंदे यांनी गायलेल्या 'कुणी नाही केलं भलं व माय भीमानं केलं...' या गाण्यावर आमदार गायकवाडसह उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ताल धरत नृत्य केले. यावेळी उपस्थित भीम अनुयायांनी मनमुराद आनंद लुटला. त्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. उपस्थितांनीही मोठ्या जल्लोषात साथ दिली.