* जागतिक महिला दिनानिमित्त डॉ. प्रिया बोचे यांचे प्रबोधन
सिंदखेड राजा : (एशिया मंच न्यूज )
उत्कर्ष फाउंडेशन संचालित, उत्कर्ष कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या वतीने 'जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विशेष व्याख्यानाचे आयोजन रेशमाई सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप अवसरमोल लाभले होते. प्रमुख वक्त्या म्हणून संत भगवान बाबा कला महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रिया बोचे यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी भानुबाई राठोड यांची विशेष उपस्थिती लाभली, तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून प्रियंका मेहेत्रे हिने व्यासपीठावर उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ यांच्या विचारांना अभिवादन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मल्लिकार्जुन कोथडीकर यांनी केले. ज्यामध्ये त्यांनी महिला दिनाचे महत्त्व विशद केले. यानंतर प्रा. सुमेध खरात यांनी उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचा सविस्तर परिचय करून दिला. मनोगत व्यक्त करताना प्रा. नरहरी राऊत, प्रा. अमितकुमार खरात यांनी स्त्री-पुरुष समानतेच्या काळातील आव्हानांवर प्रकाश टाकला. त्यानंतर प्रमुख वक्त्या डॉ. प्रिया बोचे यांनी “Rights to Reality: Taking Action for Gender Justice” या विषयावर आपले बीजभाषण दिले. त्यांनी आपल्या भाषणातून महिलांच्या हक्कांची अंमलबजावणी प्रत्यक्ष जीवनात कशी करावी, याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य संदीप अवसरमोल यांनी शिक्षणातूनच समाजात वैचारिक परिवर्तन शक्य असल्याचे सांगितले. शेवटी प्रा. अमितकुमार खरात यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे नेटके आयोजन, सूत्रसंचालन इंग्रजी विभागाच्या प्रा. स्नेहांकिता पुंडकर यांनी केले. या सोहळ्याला महाविद्यालयातील प्राध्यापक वृंदातून प्रा. वीरेंद्र तायडे, प्रा. पांडुरंग तांबेकर, तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी परीक्षित जंजाळकर, नरेश जाधव, शुभम भाग्यवंत आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह निर्माण केला.
