पत्रतपस्वी स्व. सोमनाथ सावळेंच्या कन्या श्रुती सावळे यांनी घेतली दंतशास्त्राची वैद्यकीय क्षेत्रात सुवर्ण भरारी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
ज्यांच्या लेखणीने अन्यायावर प्रहार केले, ज्यांच्या शब्दांनी बुलढाण्याच्या मातीतील पत्रकारितेचा इतिहास सुवर्णक्षरांनी लिहिला, त्या 'शब्दप्रभू स्व. सोमनाथ सावळे पाटील यांच्या संस्कारांच्या बागेत आज यशाचे एक सुगंधी फूल उमलले आहे. आपल्या वडिलांचे स्वप्न डोळ्यांत साठवून, कष्टाची पराकाष्ठा करत डॉ. श्रुती सोमनाथ सावळे यांनी दंतशास्त्राची पदवी संपादन केली आहे. नागपूरच्या सुप्रसिद्ध स्वर्गीय दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालयाच्या प्रांगणात हा दीक्षांत सोहळा पार पडला, जो केवळ एका पदवीदानाचा समारंभ नसून, एका लेकीने आपल्या पित्याला दिलेली शब्दांची 'सुवर्णपुष्पांजली' ठरला.
बुलढाण्याच्या पत्रकारितेच्या क्षितिजावर ज्यांचे नाव अढळ पदावर आहे, त्या सोमनाथ सावळे पाटील यांनी अनेक पिढ्यांचे पत्रकार घडवले. त्यांना स्वतःला समाजसेवेची ओढ होती आणि आपली लाडकी कन्या श्रुती हिने डॉक्टर होऊन रुग्णसेवा करावी, हे त्यांचे उराशी बाळगलेले स्वप्न होते. मात्र, काळाने घाला घातला आणि नियतीने पित्याचे छत्र हिरावून नेले. अशा कठीण प्रसंगी, वडिलांचा तो शब्द आणि त्यांच्या डोळ्यांतील ती चमक श्रुती यांनी आपली प्रेरणा मानली. एका बाजूला अभ्यासाचा डोंगर आणि दुसऱ्या बाजूला पितृछत्र हरपल्याचे दुःख. मात्र, डॉ. श्रुती यांनी 'जिद्द, चिकाटी आणि मेहनत' या त्रिसूत्रीच्या जोरावर यशाचे शिखर सर केले.
आज जेव्हा त्यांच्या गळ्यात पदवीचे मानचिन्ह पडले आणि अंगावर गौरवाची पारंपरिक शाल आली, तेव्हा जणू आभाळातून सोमनाथ सावळे हे दृश्य पाहून तृप्त मनाने आशीर्वाद देत असावेत, अशी भावना उपस्थितांमध्ये दाटून आली होती. या यशामागे डॉ. श्रुती यांच्या मातोश्री सुरेखा सोमनाथ सावळे यांची तपस्या मोठी आहे. पतीच्या पश्चात कुटुंबाचा डोलारा सांभाळत त्यांनी लेकीच्या पंखात बळ भरले. तसेच, श्रुती यांची मोठी बहीण मृणाल सावळे यांनी एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे आपल्या धाकट्या बहिणीला मार्ग दाखवला. वडिलांच्या निधनानंतर मृणाल यांनी केवळ कुटुंबाची जबाबदारीच पेलली नाही, तर वडिलांचा पत्रकारितेचा देदीप्यमान वारसाही समर्थपणे पुढे नेला. एकाच वेळी वैद्यकीय क्षेत्रातील कठीण अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि दुसरीकडे घराण्यातील पत्रकारितेची ज्योत तेवत ठेवणे, हे डॉ. श्रुती आणि मृणाल या दोन्ही भगिनींनी करून दाखवले आहे.
* सोहळा भावूक अन् दिमाखदार :
नागपूर येथील समारंभात जेव्हा डॉ. श्रुती यांचे नाव पुकारले गेले, तेव्हा संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले. त्यांना सन्मानपत्र आणि पदक प्रदान करताना उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या संघर्षाचे आणि यशाचे विशेष कौतुक केले. पारंपरिक वेशभूषेत, कपाळावर यशाचा टिळा आणि डोळ्यांत भविष्यातील स्वप्ने घेऊन उभ्या असलेल्या डॉ. श्रुती या सावळ्यांच्या घराण्यातील लख्ख प्रकाश वाटत होत्या.
“माझ्या बाबांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावे. आज ती पदवी माझ्या हातात आहे, पण हे यश केवळ माझे नाही. हे माझ्या आईचे कष्ट, माझ्या मोठ्या बहिणीचे मार्गदर्शन आणि माझ्या गुरुजनांचा आशीर्वाद आहे. भविष्यात दंत आरोग्य क्षेत्रात काम करताना गरीब आणि गरजू रुग्णांची सेवा करणे हीच माझी प्राथमिकता असेल. समाजसेवेच्या माध्यमातून मी माझ्या बाबांचा वारसा पुढे नेईन”, आशा विनम्रतेच्या भावना डॉ. श्रुती यांनी पदवी ग्रहण केल्यानंतर व्यक्त केल्या.
* पत्रकारितेचा वारसा अन् यशाचा उदोउदो :
बुलढाणा जिल्ह्यात आणि पत्रकारिता क्षेत्रात या बातमीने आनंदाची लाट पसरली आहे. ज्या सोमनाथ सावळे यांनी निस्वार्थपणे पत्रकारितेचे संस्कार अनेकांवर केले, त्यांच्या कन्येने मिळवलेले हे यश म्हणजे त्या पुण्याईचे फळ असल्याची भावना व्यक्त होत आहे. सोशल मीडियावरून आणि प्रत्यक्ष भेटीतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी, राजकीय नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी डॉ. श्रुती यांचे कौतुक केले असून, त्यांना भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
