* केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांचे स्विकारले निमंत्रण
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
जगप्रसिद्ध लोणार सरोवर, राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजा या पावन भूमीला भेट देऊन , पुरातत्व विभागाची बैठक बुलडाणा जिल्हयात घेण्याची विनंती केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन आज केली. पर्यटनमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवित बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्याचे निमंत्रण स्वीकारले आहे .
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे उल्कापातामुळे निर्माण झालेलं जगविख्यात सरोवर आहे . या सरोवराला नुकताच रामसर सरोवराचा दर्जाही मिळाला आहे . लोणार सरोवरातील पाण्याची पातळी वाढत चालली आहे, त्यामुळे परिसरात असलेले पुरातन मंदिर ही जलमय झाले आहेत . ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेव जतन संदर्भात हा चिंतेचा विषय ठरला आहे. या विषयी तज्ञांना पाचारण करून संशोधन होणे गरजेचे आहे, असे मत ही केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी पर्यटनमंत्र्यांसोबत चर्चा करतांना व्यक्त केले . यावेळी श्रद्धाळूच्या कुंड जल स्नान विषयावरही चर्चा केली . पूर्वी या परिसरातील जलकुंडामध्ये श्रद्धाळूना स्नान करण्याची आणि धारातीर्थ गोमुखातून कावड यात्रेसाठी पाणी घेऊन जाण्याची मुभा होती परंतु कोविड काळामध्ये हे क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आले होते. कोविडचा काळ संपुष्टात आल्यानंतर प्रतिबंधक नियम मागे घेण्यात आली नाही हे नियम शिथिल करण्यासंदर्भात पुरातत्व विभागाला सूचना करण्याची विनंती केली हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंचा जन्मस्थळ ही बुलढाणा जिल्ह्यातील सिदखेडराजा येथे आहे. राजे लखोजी जाधव यांचा राजवाडा व इतरही ऐतिहासिक वास्तू येथे अस्तित्वात आहे. उत्खननादरम्यान भगवान विष्णूची मूर्ती येथे मिळाली. धार्मिक भावनांचा आदर करत या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मंदिर बनविणे गरजेचे आहे . शिवाय या परिसरामध्ये ऐतिहासिक वस्तूच्या निर्माण व ऐतिहासिक वारसा टिकून ठेवण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. पर्यटन विभागाच्या माध्यमातून यासाठी निधी द्यावा . जगप्रसिद्ध लोणार सरोवर आणि ऐतिहासिक राजमाता जिजाऊ जन्मस्थळ हे दोन्हीही स्थळ पर्यटन विभागाच्या अंतर्गत येत असल्याने येथील विविध समस्यांचे निवारण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रत्यक्ष या स्थळांना भेटी देऊन येथेच विकासात्मक बाबीवर चर्चा करून बैठक घ्यावी, अशी विनंती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज 12 मार्च रोजी दिल्ली येथे केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन केली व बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन या दोन्ही स्थळांना भेटी देण्याचं निमंत्रण दिले . पर्यटनमंत्र्यांनीही सकारात्मकता दर्शवीत हे निमंत्रण स्वीकारले आहे.
