* ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ चा संदेश
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
संत निरंकारी मिशनच्या विद्यमान सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जगभरातील जलाशये, लघु– मध्यम जलप्रकल्प, तलाव अशा ठिकाणी ‘प्रोजेक्ट अमृत’ हे स्वच्छता अभियान राबविले जात आहे. त्यानुसार २२ फेब्रुवारीला बुलढाणा शहरालगत असलेल्या येळगाव धरण परिसराची स्वच्छता करण्यात आली. या माध्यमातून ‘ स्वच्छ जल, स्वच्छ मन’ असाही संदेश देण्यात आला आहे.
संत निरंकारी मिशन ही अध्यात्मिक विचारधारा असून, निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन अंतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. मिशनचे तत्कालीन सद्गुरु बाबा हरदेवसिंह जी महाराज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने जगभरात स्वच्छता अभियान दरवर्षी राबविले जाते. त्यानुसार, यंदाही प्रोजेक्ट अमृत अंतर्गत येळगाव धरण परिसराची स्वच्छता करण्यात आली. जल हे जीवन आहे, त्यामुळे ते पवित्र असले पाहिजे. त्याप्रमाणेच, जीवन जगत असताना मनाची देखील पवित्रता महत्त्वाची असल्याचा महत्त्वपूर्ण संदेश या अभियानातून दिल्या गेला. संत निरंकारी मिशन बुलढाणा शाखेचे मुखी हनुमान भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सेवादल शिक्षक सुभाष राजपूत यांच्या नेतृत्वात बुलढाण्यातील शेकडो सदस्यांनी स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला. येळगाव धरण परिसरातील कचरा एकत्रित संकलन करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. संत निरंकारी मिशनतर्फे राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे विविध स्तरावरून स्वागत होत आहे.
