सुंदरखेड येथे संत गाडगे बाबा यांची १५० वी जयंती उत्साहात साजरी

सुंदरखेड येथे संत गाडगे बाबा यांची १५० वी जयंती उत्साहात साजरी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
      गुरुदेव सेवा मंडळ सुंदरखेड यांच्या वतीने श्री अण्णासाहेब मळसने यांच्या शेतात महाराष्ट्रातील शेवटचे संत म्हणून ओळखले जाणारे संत गाडगे बाबा यांची १५० वी जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. ग्रामीण साधेपणा, भक्तीभाव आणि सामाजिक जाणीव यांचा संगम घडविणारा हा कार्यक्रम समाजजागृतीचा प्रेरणादायी सोहळा ठरला.
        कार्यक्रमाला करवंड महोत्सवाचे संकल्पक सुनील जवंजाळ पाटील, दलित मित्र शेषराव पाटील, प्रा. किसनराव वाघ, अण्णासाहेब म्हळसने यांची प्रमुख उपस्थिती होती. परिसरातील ग्रामस्थ, महिला भगिनी, युवक, शेतकरी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे हा कार्यक्रम औपचारिकतेपुरता मर्यादित न राहता सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीचे रूप धारण करताना दिसून आला.
जयंतीनिमित्त परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. “स्वच्छता हीच खरी पूजा” हा गाडगे बाबांचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून साकारताना दिसला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात साळुंखे सर यांनी गाडगे महाराजांच्या जीवनकार्यावर सविस्तर प्रकाश टाकत अनेक आठवणींना उजाळा दिला.
प्रभावी मार्गदर्शन गाडगे बाबांवर पीएचडी केलेले प्रा. किसनराव वाघ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, गाडगे बाबांचे कार्य केवळ भजन-कीर्तनापुरते मर्यादित नव्हते, तर ते सामाजिक क्रांतीचे व्यापक आंदोलन होते. अंधश्रद्धा, जातिभेद, अस्वच्छता आणि व्यसनाधीनतेविरुद्ध त्यांनी आयुष्यभर लढा दिला. श्रमसंस्कार आणि स्वावलंबनाची शिकवण त्यांनी समाजात रुजवली.
       कार्यक्रमाध्यक्ष शेषराव पाटील यांनी गाडगे बाबा हे खऱ्या अर्थाने समाजसुधारक होते, असे सांगत त्यांच्या कार्याचा दुर्बल घटकांवर झालेला प्रभाव अधोरेखित केला.
बावनबुरजी वारशावर विचारमंथन
यावेळी सुनील जवंजाळ पाटील यांनी बावनबुरजी या ऐतिहासिक वारशाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, अशा ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. स्थानिक युवकांनी इतिहास जाणून तो पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. व पुढील वर्षीच्या जयंती मध्ये आपण सर्वात पुढे राहून फार मोठी जयंती साजरी करूत असेही ते बोलताना म्हणाले. गाडगे बाबांच्या जीवनावर त्यांनी फार मोठा प्रकाशझोत टाकला. व विनम्र अभिवादन केले.
      भक्तिमय वातावरण महिला भगिनींची उपस्थिती विशेष लक्षणीय होती. भजन, अभंग आणि समाजप्रबोधनपर गीतांमुळे कार्यक्रमात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. प्रल्हादराव पडघान यांनी संत गाडगे बाबांची वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधले.
सामाजिक एकतेचा संदेश
कार्यक्रमातून स्वच्छता, समता, श्रमसंस्कार आणि समाजसेवेचा संदेश अधोरेखित झाला. ग्रामस्थांनी दरवर्षी जयंती अधिक व्यापक स्वरूपात साजरी करण्याचा तसेच गावात सतत स्वच्छता व सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.
सूत्रसंचालन इंगळे सर यांनी केले. गजाननराव आडवे, आर.आर. लोखंडे, अविनाश डुकरे, संजय धंदर, उध्दव धंदर, चोपडे साहेब, गुरुदेव सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सावळा परिसरातील शेतात झालेला हा सोहळा केवळ स्मरणाचा कार्यक्रम न ठरता समाजजागृती, इतिहासप्रेम आणि सामाजिक एकात्मतेचा प्रेरणादायी संगम ठरला.