बुलडाणा शहरातील खराब रस्ते तात्काळ दुरुस्त करा - रविकांत तुपकर * न.प. प्रशासनाविरोधात तुपकर आक्रमक अन्यथा दिला आंदोलनाचा इशारा

बुलडाणा शहरातील खराब रस्ते तात्काळ दुरुस्त करा - रविकांत तुपकर
 * न.प. प्रशासनाविरोधात तुपकर आक्रमक अन्यथा दिला आंदोलनाचा इशारा
 बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        थंड हवेचे ठिकाण तसेच जिल्ह्याचे मुख्यालय अशी ओळख असलेल्या बुलढाणा शहरात सध्या अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली असून ठिकठिकाणी स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे. तेलगू नगर ते टिपू सुलतान चौक येथील रस्ता हा खड्डेमय झाला असून याबाबत नागरिकांच्या वाढत्या तक्रारी पाहता क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. या संदर्भात त्यांनी आज 10 जुलै रोजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांची भेट घेऊन चर्चा केली. वेळेत रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता न झाल्यास आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला.
       बुलडाणा शहर जिल्ह्याचे मुख्यालय असून सर्व महत्त्वाचे अधिकारी, पदाधिकारी या शहरात राहतात. जिल्हाभरातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी तसेच विद्यार्थी येथे शिक्षणासाठी देखील येतात. सध्या शहरातील अनेक रस्ते पावसामुळे उखडले असून रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. काही रस्ते चिखलमय झाले आहेत तर काही रस्त्यांचे गटारात रूपांतर झाले आहे. त्यामुळे छोटे मोठे अपघात घडत आहे. काही महिला, शाळकरी मुली, मुलांचा अपघात होऊन ते जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शिवाय शहरातील स्वच्छतेचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. याच प्रकारे शहरातील तेलगू नगर ते टिपू सुलतान चौक हा रस्ताही खूप खराब झाला असून त्यामध्ये खड्डे पडले आहेत, संपूर्ण रस्त्यावर पाणी साचून गटार तयार झाले आहे, चिखल आणि घाण पाणी साचल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका तयार झाला आहे. या सर्व बाबी युवा नेते रविकांत तुपकर यांनी पालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्या निदर्शनास आणून दिल्या. शहरातील विविध रस्त्यांची दैनंदिन अवस्था आणि अस्वच्छता याबाबत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून तातडीने उपाय योजना करण्याची मागणी केली. रस्त्याचे काम तात्काळ झाले नाही तर बुलडाणा न.प. प्रशासनासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी न.प.मुख्याधिकाऱ्यांना दिला. 
        यावेळी रविकांत तुपकर यांच्या सोबत शिष्टमंडळामध्ये ऍड. राज शेख, दिलीप राजपूत, अतुल तायडे, मोहम्मद दानिश अजहर, मिर्झा नावेद, फरदीन लाला, नदीम शेख, नवाज मिर्झा, चंद्रशेखर देशमुख उपस्थित होते.