उर्वरित पिकविम्यासाठी रविकांत तुपकरांनी मुंबईतून ठणकावले !
* अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन एआयसी च्या मुंबईच्या कार्यालयात घुसू !
मुंबई : (एशिया मंच न्युज)
बुलढाणा जिल्ह्यातील सन 2023 व 2024 चा हजारो शेतकऱ्यांचा पिकविमा अजूनही प्रलंबित आहे. नुकसान होऊनही अनेक शेतकरी पिकविम्याच्या लाभापासून वंचित असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. 'त्या' अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने पिकविमा मिळावा, यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीचे मुंबईतील कार्यालय आज 25 जून रोजी गाठत राज्याचे क्षेत्रीय व्यवस्थापक बी. प्रभाकर यांची भेट घेतली. राहिलेल्या विमा भरपाई बद्दल सविस्तर चर्चा करून त्यांना जाब विचारला व आक्रमक भूमिका घेतली.
बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील AIC विमा कंपनीकडे येणाऱ्या अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना अजून पर्यंत नुकसानभरपाई न मिळाल्याने युवा नेते रविकांत तुपकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. तुपकरांनी ए.आय.सी. कंपनीच्या मुंबई कार्यालयात जाऊन राज्याच्या क्षेत्रीय व्यवस्थापक बी. प्रभाकर यांना चांगलाच जाब विचारत, त्यांना धारेवर धरले. भारतीय कृषी आयुर्विमा कंपनीने शेतकऱ्यांना फसविले आहे. आपले कर्मचारी जास्त नुकसान टाकतो, म्हणून शेतकऱ्यांकडून पैसे उकळतात. पंचनामा फॉर्मवर आवश्यक असतांनाही कृषी सहायक, सरपंच, ग्रामसेवक यांच्या सह्या नसतात, परस्पर कमी नुकसान टाकून तुमच्या कर्मचाऱ्याकडून फॉर्म भरले जातात, असा आरोप तुपकरांनी केला. नुकसान होऊनही हजारो शेतकऱ्यांना विमा देण्यासाठी विमा कंपनी मुद्दाम टाळाटाळ करीत असल्याचेही तुपकरांचे म्हणने आहे. हा सरळ-सरळ शेतकऱ्यांवर अन्याय आहे. विमा कंपनी व सरकारचे साटेलोटे असल्याचा गंभीर आरोपही तुपकरांनी केला. 'त्या' खऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी आग्रही मागणी यावेळी तुपकरांनी जोरदारपणे लावून धरली . भरपाई लवकर मिळाली नाही तर क्रांतिकारी शेतकरी संघटना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन AIC च्या मुंबई कार्यालयात घुसेल व आक्रमक आंदोलन करेल, असा कडक इशाराही तुपकरांनी यावेळी दिला.