फक्त फोटो काढण्यासाठी बांधावर येऊ नका, मुंबईत तळ ठोका व नुकसान भरपाई घेऊनच या ! * शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची नाव न घेता मंत्री ना.प्रतापराव जाधवांवर सडकून टीका

फक्त फोटो काढण्यासाठी बांधावर येऊ नका, मुंबईत तळ ठोका व नुकसान भरपाई घेऊनच या ! 
* शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची नाव न घेता मंत्री ना.प्रतापराव जाधवांवर सडकून टीका
लोणार : (एशिया मंच न्युज)
        मेहकर, लोणार आणि सिंदखेडराजा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सत्ताधाऱ्यांवर विशेषतः केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचेवर अप्रत्यक्ष जोरदार निशाणा साधला आहे.

        तुपकर म्हणाले की, मंत्री व लोकप्रतिनिधींनी फक्त बांधावर येऊन फोटोसेशन करु नये, ताबडतोब मुंबईत जाऊन तळ ठोकून बसा आणि शेतकऱ्यांना नुकसानभरपाई घेऊनच मग वावरात या, आठवडाभरात शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मदतीची व्यवस्था झाली पाहिजे, अन्यथा शेतकऱ्यांचा संयम सुटण्याची शक्यता आहे.

       या दोन दिवसात नुकसानग्रस्त भागाचा अनेक नेत्यांनी दौरा केला. त्यामध्ये ना. प्रतापराव जाधव, शेतकरी नेते रविकांत तुपकर, आ. सिद्धार्थ खरात, आ. मनोज कायंदे माजी आमदार संजय रायमूलकर यांचा समावेश आहे. सत्ता धारी नेत्यांच्या या दौऱ्यावर रविकांत तुपकर यांनी सडकून टीका केली आहे. नुसतं फोटोसेशन करून दिखावा करू नका,  कोरडी सहानुभूती दाखवू नका, तुम्ही सत्तेत आहात, मंत्री आहात तर मुंबईत तळ ठोकून बसा आणि स्पेशल पॅकेज घेऊन या असा सल्लाही तुपकरांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांना दिला.
        आश्वासनं देऊन वेळ मारून नेऊ नका, शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई मिळाली पाहिजे, हे तुमचं कर्तव्य आहे, पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांचा आदर्श घ्या. कोल्हापूर, सांगलीत महापूर आला तर तिकडच्या नेत्यांनी मदत वाढवून घेण्यासाठी जी.आर. बदलून घेतले आणि तुम्ही फक्त फोटोसेशन करून कोरडी सहानूभूती दाखवता, असे ते म्हणाले.

* नुकसान ग्रस्तांसाठी तुपकरांची आक्रमक भूमिका :

       २७-२८ जून रोजी मेहकर, लोणार, सिंदखेड राजा भागात तुपकरांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन आपबीती समजून घेतली. आरेगाव, डोणगाव, गोहगाव, पांगरखेड, झोटिंगा, कुंभेफळ, देऊळगाव कोळ, महारचिकना, ब्राम्हणचिकना, खापरखेड घुले, वडगाव तेजन, पारडी सिरसाट यासह अनेक गावांचा दौरा केला. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळाली नाही, तर आक्रमक आंदोलन उभं करू,  असा इशारा यावेळी तुपकरांनी दिला. ते म्हणाले, परिस्थिती खूपच गंभीर आहे. पेरणी झालेली शेतजमीन खरडून गेली आहे. अशा वेळी सरकार आणि लोकप्रतिनिधींनी केवळ सहवेदना व्यक्त करत थांबू नये, तर तत्काळ मदत देण्यासाठी ऑन द स्पॉट निर्णय घ्यावेत, असेही तुपकर यांनी प्रसार माध्यमाशी बोलतांना सांगितले.