* स्वतःच्या शेतात केली सोयाबीनची पेरणी; संपूर्ण कुटुंब राबले काळ्यामातीत..
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
जिल्ह्यात सर्वदूर पेरणीयॊग्य पाऊस झाल्याने खरिपाची पेरणी सुरू झाली आहे. "काळ्या मातीत मातीत तिफन चालते" चे चित्र पहावयास मिळत आहे. दरम्यान शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी देखील स्वतः सहकुटुंब शेतात जाऊन सोयाबीनची पेरणी केली. रविकांत तुपकर यांनी स्वतः तिफन चालवली तर त्यांच्या पत्नी ऍड शर्वरी तुपकर यांनी व बी आणी खत पेरणी केली. संपूर्ण तुपकर कुटुंब दिवसभर काळ्या मातीत राबल्याचे दिसून आले.
राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीला सुरुवात केली आहे. लहानात लहान शेतकऱ्यांपासून ते शेतकरी नेत्यांपर्यंत सगळेच सध्या पेरणीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे रविकांत तुपकरही आज दिवसभर स्वतःच्या शेतात राबतांना दिसले. रविकांत तुपकर हे शेतकरी कुटुंबातील असून बुलडाणा नजीक असलेल्या सावळा गावात तुपकरांची शेती आहे. आज 18 जून रोजी तुपकरांनी स्वतःच्या शेतात तिफन चालवून परिवारासहित पेरणी केली. सकाळ पासून रविकांत तुपकरांनी तिफन हातात घेतली तर पत्नी ऍड शर्वरी व त्यांच्या वहिनी सौं. राधा तुपकर यांनी पोटाला ओट्या बांधून चाड्यावर बियाणे आणि खताची पेरणी केली. वडील चंद्रदास तुपकर व आई गीताबाई यांनी बैलांची पूजा करून नारळ फोडून पेरणीला प्रारंभ केला. रविकांत तुपकर हे स्वतः हाडाचे शेतकरी आहेत. अगदी लहानपणापासून शेतातील सर्व कामे त्यांनी केली आहेत, जनावरांचे चारा पाणी करण्यापासून दूध काढण्यापासून ते शेतातील वखरणी डवरणे अशी सगळीच कामे या शेतकरी नेत्याने वर्षानुवर्षे केली आहेत. त्यामुळे केवळ फोटोसेशन किंवा व्हिडिओ शूटिंग करण्यापुरते तिफन हाती न घेता त्यांनी प्रत्यक्ष काळ्या मातीत तिफन धरून दिवसभर पेरणी केली. बुलढाणा जिल्ह्यात सर्वत्र सोयाबीन या प्रमुख पिकाची पेरणी केली जात आहे. रविकांत तुपकर यांनी देखील स्वतःच्या शेतात सोयाबीन, मूग, उडीदाची पेरणी केली. सर्जा राजाच्या पाठीवर थाप देऊन दिवसभर काळया मातीत राबणाऱ्या या शेतकरी नेत्याने सर्वांचे लक्ष वेधले होते.