जिल्ह्याची आता परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल - पालकमंत्री ना. मकरंद पाटील* बुलडाणा जिल्हा भक्ती-शक्तीचा सुरेख संगम

जिल्ह्याची आता परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल - पालकमंत्री ना. मकरंद पाटील
* बुलडाणा जिल्हा भक्ती-शक्तीचा सुरेख संगम
बुलडाणा : (एशिया मंच न्युज)
       बुलढाणा जिल्हा हा भक्ती-शक्तीचा सुरेख संगम आहे. जिल्ह्यातील कृषी, उद्योग, आरोग्य, शिक्षण, पर्यटन, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रातील विकासातुन जिल्ह्याची परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. या सर्वांगीण विकासाच्या वाटचालीत बुलढाणा जिल्हा आता थांबणार नाही, यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी आज केले.

      देशाच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानात पालकमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी आमदार संजय गायकवाड, मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांच्यासह प्रशासनातील अधिकारी, विभाग प्रमुख, स्वातंत्र सेनानी, वीरमाता, वीरपत्नी, ज्येष्ठ नागरिक, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        पालकमंत्री ना. पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आता बुलढाणा जिल्ह्याच्याही विकासाला नक्कीच गती मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीच्या पहिल्या शंभर दिवसांचा आराखडा तयार केला असून त्यानुसार राज्य सरकार काम करणार आहे. यात बुलढाण्याचे मोलाचे योगदान राहील.

     बुलढाणा हे विदर्भाचे प्रवेशद्वार, भक्ती-शक्तीचा सुरेख संगम, स्वराज्याचे आजोळ आणि आधुनिक संत विचारांचे माहेरघर आहे. शूर सरदार लखोजी जाधवराव यांच्या घरात स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ आई साहेबांचा जन्म सिंदखेडराजा या ऐतिहासिक गावी झाला असून हे मातृतीर्थ आपल्यासाठी प्रेरणास्त्रोत आहे.

       मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत जिल्ह्यातील सुमारे साडेसहा लाख महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची मदत देण्यात आली आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधताना सामाजिक स्तरही उंचावण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यासाठी वसतिगृह, निवासी शाळा, आश्रमशाळा, स्वाधार योजना, भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, मुलींच्या विवाहासाठी कन्यादान योजना इत्यादी विविध योजना शासनाकडून राबविण्यात येत आहे. यामुळे समाजातील मागे पडलेल्या वंचित घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात सामिल करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

     भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधान आहे. या संविधानामुळे राष्ट्र निर्माणासाठी हातभार लागला आहे. प्रत्येक नागरिकाने सकारात्मक विचारातून प्रगतीकडे वाटचाल करण्याचा संकल्प करावा. येत्या काळात आपण सर्व जण चिकाटीने देशाला प्रगतीपथावर नेऊ, असे आवाहन पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी यावेळी केले.

      प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात पोलीस विभागाने शानदार पथसंचलन केले. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांव्दारे बॅण्ड ड्रिल, डंबेल्स कवायत, डिश कवायत, ॲरोबिक्स डान्स व कराटे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यावेळी प्रेक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणाला दाद दिली. कार्यक्रमाचे संचालन चंद्रशेखर जोशी व   मोरे यांनी केले.