* लेकाला घेऊन वृद्ध महिलेचे उपोषण : न्यायासाठी वंचितची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा
बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
चिखली तालुक्यातील आमखेड येथील मतिमंद शिवाजी गवई यांच्या मालकीची ०.७० आर शेतजमिन चिखली येथील अमोल सुरेशआप्पा खबुतरे यांनी बळकावल्याचा आरोप करत मतिमंद मुलगा शिवाजीला सोबत घेऊन ७० वर्षीय आई कासाबाई गवई यांनी न्याय मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. मात्र, प्रशासनाने दखल न घेतल्याने या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी पुढाकार घेतला आहे. फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल न झाल्यास पक्षाच्या वतीने तीव्र आणि व्यापक स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पवार यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वृद्ध आई आणि मुलगा उन्ह, वारा, पाऊस आणि थंडीचा मारा सहन करत उपोषणाला बसले असताना देखील प्रशासनाने दखल घेतली नाही. ही बाब समजताच वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन प्रकरण समजून घेतले. मागासवर्गीय मतिमंदावर अन्याय झाल्याने पवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन चर्चा केली. गवई कुटुंबीयांची जमीन बळकावल्याप्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी करण्यात आली.
आमखेडचे रहिवासी शिवाजी सुदाम गवई हे गतिमंद आहेत. गट नंबर ४६ मधील त्यांच्या मालकीच्या ०.७० आर जमिनीचे अमोल सुरेशआप्पा खबुतरे या व्यक्तीने बेकायदेशीर खरेदीखत करवून घेतले. शिवाजी गवई यांची ही जमीन वडिलोपार्जित असून त्यांना संबंधित जमीन वगळता उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. त्यांना दोन अपत्ये असून, वृद्ध आई, वडील आहेत. त्यांची उपजीविका याच जमिनीवर अवलंबून आहे. तसेच कोणत्याही व्यक्तीला भूमिहीन करता येत नाही, असा शासन निर्णय आहे. कमकुवत व्यक्तीची आर्थिक फसवणूक करून त्यांची मालमत्ता लुबाडणे ही बाब मानवतेला काळिमा फासणारी आहे. त्यामुळे अमोल सुरेशआप्पा खबुतरे व बेकायदेशीर खरेदीखत करून देणारे तत्कालीन सब रजिस्ट्रार तसेच या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या लोकांवर ॲट्रॉसिटी ॲक्टसह आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी सतीश पवार यांनी केली आहे. प्रशासनाने पीडित कुटुंबीयांना न्याय न दिल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.