सीईओंच्या कक्षात ठिय्या मांडून 'वंचित युवा'ने प्रशासनास धरले वेठीस! * रिकाम्या खुर्चीला घातला हार : दोन दिवसांत निलंबन मागे घेण्याचे आश्वासन

सीईओंच्या कक्षात ठिय्या मांडून 'वंचित युवा'ने प्रशासनास धरले वेठीस! 
* रिकाम्या खुर्चीला घातला हार : दोन दिवसांत निलंबन मागे घेण्याचे आश्वासन
बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)

        कर्तव्यदक्ष शिक्षक आणि ग्राम विकास अधिकाऱ्याचे नियमबाह्य केलेले निलंबन मागे घेण्याच्या मागणीसाठी 6 डिसेंबर 2023 रोजी वंचित बहुजन युवा आघाडीने जिल्हा परिषद प्रशासनाला चांगलेच वेठीस धरले. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या मांडण्यात आला. सीईओ हजर नसल्याने त्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. निलंबन रद्द करेपर्यंत जागचे हलणार नाही, अशी आक्रमक भूमिका जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी घेताच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) समाधान वाघ व शिक्षणाधिकारी खरात यांनी दोन दिवसांत निलंबन मागे घेण्याचे आश्वासन दिले.
       तालुक्यातील इजलापूर जिल्हा परिषद शाळेचे सहायक शिक्षक रविकांत जाधव तसेच पिंपळगाव सराईच्या ग्रामविकास अधिकारी ज्योती मगर यांचा कर्तव्यात कुठलाही कसूर नसताना बीडीओ सुनीता पवार यांनी दोघांचे निलंबन केले. शिक्षक जाधव यांनी शिक्षण विभागात उल्लेखनीय कार्य केले आहे. शासनाने दखल घेत त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले आहे. मात्र, शिस्तभंगाचा आरोप ठेऊन निलंबित करून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला. त्याचप्रमाणे ग्रामविकास अधिकारी ज्योती मगर यांच्यावर द्वेषभावनेने आणि राजकीय दबावाखाली निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे नमूद करीत वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी अन्यायकारक कारवाई मागे घेण्यासाठी सीईओंना सात दिवसांचा अल्टिमेटम दिला होता.
या काळात जि.प. प्रशासनाने निलंबन मागे न घेतल्याने जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी जि.प.मध्ये धडक दिली. यावेळी जि.प. प्रशासनाविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. 
      यावेळी प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) समाधान वाघ व शिक्षणाधिकारी (प्राथमिक)खरात हे हजर झाले. पवार यांनी धारेवर धरत नियमबाह्य कारवाई तातडीने मागे घेण्याची मागणी रेटून धरली. अखेर दोन्ही अधिकाऱ्यांनी दोन दिवसांची मुदत मागून निलंबन मागे घेण्याचे आश्वासन दिले. तसेच झालेली कारवाई घाईघाईत सदोष झाल्याचे सांगत दिलगिरीही व्यक्त केली.
आंदोलनाच्या धर्तीवर शहर पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. जिल्हा संघटक बाला राऊत, महासचिव अर्जून खरात, अनिल पारवे, राहुल वानखेडे, गौतम गवई, संतोष कदम, राहुल दाभाडे, सतीश गुरचवळे, संजय जाधव, ॲड. के.ए. कदम, ॲड. एस.एस. सुरडकर, संजय वानखेडे, बाळू बोर्डे, किरण पवार, विजय पवार, अनिल पवार, समाधान पवार, वंसता वानखडे, योगेश हिवाळे, पैठणे, आकाश जाधव, विशाल डोंगरदिवे, शुभम जाधव, समाधान पडघान, नितिन जाधव, सागर काळे, पंकज जाधव, लहु वाकोडे, रोहित हिवाळे, महेंद्र सरदार, राजेंद्र जाधव, विशाल साळवे, रतन पवार, बाबासाहेब शिनगारे, रविराज शिनगारे, गजानन बनसोडे, मनोज अंभोरे, गौतम वानखेडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सामील झाले होते.
 
* बीडीओ पवारांच्या निलंबनाची मागणी : 
       बुलढाणा पंचायत समितीच्या बीडीओ सुनीता पवार या द्वेष भावनेतून व राजकीय नेत्यांचे हित सांभाळून प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक कारवाई करत असल्याचा आरोप सतीश पवार यांनी केला. बीडीओ पवार यांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी रेटून धरली. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) आशिष पवार हेदेखील उपस्थित होते.

* आक्रमक होताच उघडले द्वार : 
        दरम्यान, पदाधिकारी व कार्यकर्ते सीईओंच्या केबीनकडे येणार म्हणून आधीच प्रशासनाने केबीनच्या गेटला कुलूप लावून ठेवले होते. आम्ही संविधानिक मार्गाने आंदोलन करणार, याची जाणिव असतानाही द्वार बंद केल्याने सतीश पवार संतप्त झाले. त्यांची आक्रमकता पाहून अखेर नरमलेल्या प्रशासनाने गेट उघडून दिले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या केबीनमध्ये ठिय्या मांडण्यात आला. त्यातच सीईओ भाग्यश्री विसपुते हजर नसल्याने त्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून रोष व्यक्त करण्यात आला.