जातविरहित समाजनिर्मिती होणे काळाची गरज : साहित्यिक सुरेश साबळे

जातविरहित समाजनिर्मिती होणे काळाची गरज :  साहित्यिक सुरेश साबळे
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       बदलत्या काळानुसार जातविरहित  समाज रचना निर्माण होणे दीर्घ समाज स्वास्थ्याची गरज म्हणून अत्यंत आवश्यक आहे. सामाजिक विषमतेमुळे माणूस माणसापासून स्वतःला असुरक्षित समजतो आहे. जातीभेदानी माणसाला गुलाम केले आहे. धर्माने माणसामध्ये संस्कारशील विधायक परिवर्तन घडवून आणले पाहिजे. धर्मासाठी माणूस नाही तर माणसासाठी धर्म आहे. धर्म म्हणजे माणसाचे शोषण करणारी संस्था नव्हे. माणसाचे सर्वांगीण कल्याण हाच धर्माचा गाभा असला पाहिजे. माणुस हीच जात अन माणुसकी हाच धर्म हे सूत्र सामाजिक स्वास्थ्य आणि राष्ट्रीय एकात्मतेच्यादृष्टीने महत्वाचे आहे, असे विचार साहित्यिक सुरेश साबळे यांनी चौदावे बुलढाणा जिल्हा साहित्य संमेलनात जात, वर्ण निर्मिती आणि संघर्ष या विषयावर निमंत्रित व्याख्याते बोलतांना मांडले.
       हे साहित्य साहित्य संमेलन आद्य स्त्रीवादी लेखिका ताराबाई शिंदे साहित्य नगरी (जिजामाता कॉलेज) बुलढाणा येथे बोलत होते. या सत्राच्या अध्यक्षस्थानी भाषा संशोधक, नाटककार प्रा. रवींद्र इंगळे चावरेकर तर सह व्याख्याते हिंगोलीचे प्रा. डॉ. शत्रुघ्न जाधव सभास्थानी हजर होते. प्रारंभी संमेलन आयोजकांचे वतीने प्रा. गोविंद गायकी यांनी उपस्थितांचे स्वागत, गौरव केल्यावर कार्यक्रमाचे निवेदक प्रशांत सोनुने यांनी प्रास्ताविक केले.
        व्याख्याते प्रा. डॉ. शत्रुघ्न जाधव हिंगोली यांनी मनोगतात समकालीन जात वास्तवावर चर्चा करतांना अनेक सामाजिक व जातीय भीषण वास्तवावर परखड भाष्य केले. त्यांनी सामाजिक चालीरिती, जनव्यवहार इ.वर जोरकसपणे भाष्य केले. सत्राचे अध्यक्ष प्रा. रवींद्र इंगळे चावरेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात वक्त्याच्या भाषणाचा गोषवारा घेत जात, वर्ण निर्मिती आणि संघर्ष या संबंधाने मांडणी करतांना तज्ञ अभ्यासक आणि इतिहासातील तथ्य आणि पुराव्याच्या आधारे जात, वर्ण पंथ आणि धर्माच्या निर्मितीची चर्चा केली.आणि वर्तमान जातीचा, कुळाचा व्यवहार, आचार आणि धारणा याबाबत भक्कम संदर्भ देत अध्यक्षीय मनोगत मांडले.
        या प्रसंगीं सभा मंडपात संमेलन अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, प्राचार्य डॉ. प्रशांत कोठे, रवींद्र साळवे, शाहिर डी. आर. इंगळे, के. ओ. बावस्कर, गोविंद गायकी, भाऊ भोजने, शशिकांत इंगळे, विजयालक्ष्मी वानखेडे, कवी मांगीलाल राठोड,       प्रा. डॉ. पैकीणे,  प्रा. डॉ. सुबोध चिंचोले इ. सह जिल्हाभरातून आलेले साहित्यिक, साहित्य रसिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत सोनुने तर आभार संदीप राऊत यांनी मानले.