सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या एकजुटीची ताकद दाखवून देऊ : रविकांत तुपकर* एल्गार रथयात्रेचे गावोगावी जल्लोषात स्वागत

सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या एकजुटीची ताकद दाखवून देऊ : रविकांत तुपकर
* एल्गार रथयात्रेचे गावोगावी जल्लोषात स्वागत
 
शेगाव : (एशिया मंच वृत्त)
      संपूर्ण राज्यात दुष्काळाची भयावह परिस्थिती आहे. विदर्भ- मराठवाड्यातील सोयाबीन - कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्येचे उंबरठ्यावर उभा आहे. दरम्यान सरकारने राज्यातील केवळ चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ दाखवून उर्वरित तालुक्यांमधील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील दोनच तालुक्यांमध्ये शासनाला दुष्काळ दिसतो इतर तालुके मात्र दिसून येत नाही. सरकारच्या डोळ्यावरची ही धुंदी उतरण्यासाठी ही एल्गार रथयात्रा असून, २० नोव्हेंबरला होणाऱ्या महामोर्चातून सरकारला शेतकऱ्यांच्या एकजुटीची ताकद दाखवून देऊ, असे प्रतिपादन रविकांत तुपकरांनी केले.
         शेगाव येथे संत श्री गजानन महाराजांचे दर्शन घेऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी ५ नोव्हेंबर रोजी एल्गार रथयात्रेला सुरुवात केली. याच दिवशी शेगाव तालुक्यातील गौलखेड, जलंब, पहूरजीरा तर खामगाव तालुक्यातील वाडी, माक्ता, माक्ता-वाडी, जळका भडंग, पिंपळगाव राजा, निपाणा, कुंबेफळ, ढोरपगाव भालेगाव व काळेगाव या गावांमध्ये ही यात्रा पोहोचली. तर आज 6 नोव्हेंबर रोजी खामगाव तालुक्यातील नांद्री, वर्णा, कंझारा, शिरसगाव देशमुख येथे यात्रेदरम्यान रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला तर दुपार नंतर रोहणा, खुटपुरी, मांडका फाटा, धापटी, गोंधणापूर फाटा येथे शेतकऱ्यांनी यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. आवार, अटाळी, गौंढाळा, लाखणवाडा या गावांमध्ये सभा पार पडल्या. पहिल्या व दुसऱ्या दिवशी एल्गार रथयात्रेचा शेगाव व खामगाव तालुक्यातील शेतकरी, शेतमजूरांनी जल्लोषात स्वागत केले.