* दिशा फेडरेशनच्या जिल्हास्तरीय बचतगट प्रदर्शनीचे उदघाटन
बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
समाजात चांगले काम करणाऱ्या सावित्री भरपूर आहेत. त्यांच्या पाठीशी उभे राहणारे ज्योतिराव होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध दिग्दर्शक नीलेश जळमकर यांनी केले.
येथील शासकीय अध्यापक महाविद्यालया समोरील प्रांगणात ४ नोव्हेंबर २०२३ रोजी आयोजित जिल्हास्तरीय महिला उद्योजक तथा बचतगट प्रदर्शनीचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ऍड. गणेश पाटील होते. कार्यक्रमाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, आमदार धिरज लिंगाडे, राजेश एकडे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, विजय अंभोरे, ज्येष्ठ नेते मुखत्यारसिंग राजपूत, प्रदेश सचिव डॉ.स्वातीताई वाकेकर, लक्ष्मण घुमरे, माजी सभापती दिलीप जाधव, रामविजय बुरुंगले, ऍड. गणेशसिंग राजपूत, सत्येंद्र भुसारी, हाजी रशीद खा जमादार, सुनील सपकाळ, रिजवान सौदागर, निसार चौधरी, गजानन मामलकर, माधुरीताई देशमुख, उषाताई चाटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना जळमकर यांनी सत्यशोधक हा आगामी चित्रपट डोळ्यावर चष्मा लावून नव्हे तर डोळे उघडुन पहावा असे आवाहन केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महानायिकांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविकात दिशा बचतगट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्ष जयश्रीताई शेळके यांनी दिशा फेडरेशनच्या प्रगतीचा धावता आढावा घेतला. सहा वर्षांपूर्वी स्थापना झालेल्या फेडरेशनसोबत १५०० बचतगट संलग्न आहेत. हजारो महिला स्वावलंबी झाल्या आहेत. बचतगटांनी महिलांना पाठबळ, हिम्मत दिली. लघु उद्योजक बनण्याचा आत्मविश्वास दिला. ही मोठी उपलब्धी असल्याचे जयश्रीताई शेळके म्हणाल्या.
बचतगटांच्या माध्यमातून जयश्रीताई शेळके यांचे मोठे काम असून त्या समाजाला पुढे नेणारे नेतृत्व आहे, असे विजय अंभोरे म्हणाले. धीरज लिंगाडे यांनी जयश्रीताई शेळकेंचे कामाचे कौतुक करुन प्रत्येकाच्या सुख- दुःखात त्या सहभागी असतात असे सांगितले.जयश्रीताईंनी महिलांना आत्मनिर्भर करण्याचं काम केलं, असे आमदार राजेश ऐकडे म्हणाले.
बचतगटांच्या माध्यमातून जयश्रीताई शेळके यांनी महिलांना स्वावलंबन आणि आर्थिक स्वातंत्र्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. दिशा फेडरेशनमुळे हजारो महिला प्रगतीच्या वाटेवर आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष ऍड. गणेश पाटील यांनी केले. बचतगटांच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठा उद्योग उभा राहावा, असा आशावाद संजय राठोड यांनी व्यक्त केला. श्यामभाऊ उमाळकर यांनी बचतगट चळवळीचा इतिहास सांगून हा आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग असल्याचे सांगितले. उपस्थित महिलांच्या एकजुटीचे त्यांनी कौतुक केले. जयश्रीताईंनी महिलांसाठी केलेलं काम मोठे आहे. येणाऱ्या काळात बचतगटांच्या माध्यमातून उत्पादित झालेल्या मालाला विक्रीसाठी मोठे मार्केट उपलब्ध झाले पाहिजे, असे विचार राहुल बोंद्रे त्यांनी व्यक्त केले. संचलन शिप्रा मानकर यांनी केले तर आभार भारती कोल्हे यांनी मानले.
